अकोला : सणासुदीच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या काळात व्यावसायिकांकडून नफेखोरी करण्यासाठी खवा, पनीर आदी पदार्थांमध्ये भेसळीच्या प्रमाणात देखील वाढ होत असते. हे भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. सोलापूर येथून अकोल्यात भेसळयुक्त पनीरचा साठा आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी बसमधून दोघांनी हे पनीर अकोल्यात आणले. गुप्त माहितीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ११६ किलो पनीर जप्त करीत दोघांविरुद्ध कारवाई केली.
हेही वाचा >>> बैलजोडीचे पूजन करून ओबीसींचे आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा
सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. या कालावधीत पनीर, खवा, दूध, दही चक्का आदी पदार्थांच्या मागणीमध्ये मोठी वाढ होत असते. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने त्याची भाव वाढ होते. अनेक व्यावसायिकांकडून भेसळ सुद्धा केली जाते. अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरातील चंद्रभान ठाकूर यांच्या मालकीच्या मे श्री सूर्या ट्रेडस व महसूल कॉलनीतील रोशन पोद्दार यांच्या मालकीच्या अग्रवाल स्वीटस या दोन विक्रेत्यांकडे सोलापूर येथून एका खासगी बसने पनीरचा साठा बोलावण्यात आला होता. या दोघांकडे आलेला पनीरचा साठा भेसळयुक्त असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक रावसाहेब वाकडे यांनी ११६ किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. या पनीरची खुल्या स्वरूपात वाहतूक करण्यात येत होती तर काही पनीरची साठवणूक केल्याचे समोर आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पनीरमध्ये दोष आढळल्यास न्यायालयात खटला दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.