नागपूर: महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक व्रत व उपास करतात. त्यानिमित्त भगर, शिंगाडा व राजगिरा पीठापासून बनलेले पदार्थाचे सेवन केले जाते. भगर, शिंगाडा व राजगिरा पीठात बुरशीजन्य जंतूचा धोका आहे. त्यामुळे हे पदार्थ घेताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. काही महिन्यापूर्वी शिंगाडा पीठापासून तयार पदार्थामुळे अनेकांना विषबाधा झाली होती, हे विशेष.
उपवासाच्या निमित्ताने जे अन्नपदार्थ घेतले जातात ते आरोग्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत की नाही याची खातरजमा केली जात नाही. यात भगरमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यात विषद्रव्य तयार होतात. ३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असल्याने भगर जर खाण्यात आली तर मोठ्या प्रमाणात विषबाधेची शक्यता असते. भगर, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ यात बुरशीजन्य जंतूंची शक्यता नाकारता येत नसल्याने हे पदार्थ दुकानातून घेताना तपासून घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे.
काय काळजी घ्याल?
बाजारातून भगर, सिंगाडा पीठ राजगिरा पीठ आणल्यानंतर ते व्यवस्थित निवडून स्वच्छ करणे आवश्यक आहे. विशेषता पाकिटबंद असलेले पदार्थ अधिक सुरक्षित समजले जातात. ते घेताना जर लेबल नसलेली पाकिटे अथवा ती फुटलेली असल्यास घेऊ नयेत. याचबरोबर खुली भगर सिंगाडा पीठ राजगिरा पीठ हे घेणे टाळावे. पाकिटावर देण्यात आलेले दिनांक व त्यावर नोंदविलेला अंतिम वापर दिनांक ग्राहकांनी आवर्जून तपासला पाहिजे. भगर साठविताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी साठवावी विशेषता झाकण बंद डब्यात ठेवणे आवश्यक आहे. जास्त दिवस साठवलेले भगर खाऊ नये भगरीचे पीठ विकत आणू नये. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे या पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते हे लक्षात घेतले पाहिजे.
विक्रेत्यांसाठी सूचना
विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार लेबल वर्णन असलेले भगर, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ याचीच विक्री करावी. खरेदी करताना घाऊक विक्रेत्यांकडून पावती घ्यावी. या पदार्थांच्या पॅकेटवर पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक, त्याची पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. मुदत बाह्य अन्नपदार्थाची विक्री करू नये असेही अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.