नागपूर : मानवी इतिहासातील हा सर्वांत धोकादायक काळ आहे. संपूर्ण जग अण्वस्त्र हल्ल्याच्या छायेत आहे. भविष्यात फार मोठ्या धोक्याच्या घटना घडण्याची भीती असून यात सृष्टीचा सर्वनाश होऊ शकतो, अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली. या अण्वस्त्र हल्ल्यात भारताचा प्रत्यक्ष संबंध राहणार नसला तरी या युद्धाचे परिणाम भारतालाही भोगावे लागतील असेही ते म्हणाले.
प्रेस क्लब येथे आयोजित ‘मिट द प्रेस’मध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अमेरिका, रशिया, चीन या तीनपैकी कोणत्याही दोन राष्ट्रांत युद्ध होण्याची शक्यता आहे. हे तीनही देश अणू आणि जैविक शस्त्रांचा वापर करून तिसऱ्या महायुद्धाची तयारी करीत आहेत. हे युद्ध जरी या तीन देशांमध्ये झाले तरी आपणही त्याला बळी पडू. आपल्याही देशावर त्याचे परिणाम होतील. अणू युद्धाच्या भीतीने आपण घाबरलो असल्याचेही डॉ. वासलेकर म्हणाले. रशियाकडे एक ॲवॉनगॉड नावाचे क्षेपणास्त्र आहे. ॲवॉनगॉडमध्ये ध्वनीचा वेग त्याच्या २७ पट आहे. खाली एकदा प्रोगॅमिंग केले की पुढचा मार्ग तो स्वत: ठरवतो.
हेही वाचा : माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार
यावर नंतर लष्कराचेही नियंत्रण राहत नाही. आता अशाप्रकारची नवीन क्षेपणास्त्रे आली असून ही अधिक धोकादायक असल्याचेही डॉ. वासलेकर म्हणाले. अमेरिका, रशिया, चीन या तीन देशांमध्ये अणु युद्ध झाले तर फार मोठी लोकसंख्या नष्ट होणार असून जगाला फार कठीण काळातून जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या माध्यम संवादाला प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, वरिष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजीत उपस्थित होते.
हेही वाचा : यंदा नागपूर गारठणार!; २४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट
भारताच्या शेजारील देशाची अवस्था गंभीर
भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान या देशांमधील स्थिती फार गंभीर आहे. श्रीलंकेमध्ये काय झाले हे सर्वांनी पाहिले. अशी अवस्था पाकिस्तानमध्येही होण्याची शक्यता आहे. भारताच्या भवतालचे सर्व देश आज अस्वस्थ आहेत, असेही डॉ. वासलेकर यांनी सांगितले.