नागपूर : फेब्रुवारीच्या पूर्वार्धातराज्यातील अनेक भागात तापमानवाढ दिसून आली.दुपारी घराबाहेर पडणे कठीण होईल इथपर्यंत उन्ह होते. याच महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले. मात्र, मार्च उजाडताच राज्यातील तापमानात बऱ्यापैकी घट झालेली दिसून येत आहे. तर राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आणि थंड वारे देखील जाणवत आहे.
भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच एप्रिल-मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, मार्च महिन्याची सुरवात या अंदाजाच्या विपरीत झाली आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात किंचीत घट दिसून येत आहे. तर आज, रविवारी सकाळपासूनच वातावरणात किंचित गारवा जाणवत आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट झालेली आहे. मात्र, त्याचवेळी कोकणात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. सोलापूरमधील तापमानात अंशतः घट झाली आहे. पुण्यात आज, रविवारी आकाश निरभ्र असले तरीही येत्या काही दिवसात पुण्यातील कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सातारा आणि सांगली येथेही कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात आज दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण व मुंबईला खात्याने उष्णतेचे इशारे दिले होते. आता उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला आहे. येत्या तीन ते चार दिवसात कोकण विभागात साधारण असेच हवामान असेल.रनगिरी आणि सिंधुदूर्गात सर्वाधिक उष्णता जाणवेल असेही हवामान खात्याने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात फारसा बदल नाही. हवामान खात्याने या वर्षातील मार्च महिना सर्वात उष्ण असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे, तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.