नागपूर : जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये उपस्थिती वाढवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी, पीएच.डी. संशोधक आणि शिक्षकांवर दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२०० रुपये आणि इतरांना २००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. संशोधकांना तीन हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे.
विद्यापीठामध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे आणि सायन्स काँग्रेसचे स्थानिक सचिव डॉ. खडेकर यांनी नुकतीच सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावून सर्व विभागांमध्ये कार्यरत नियमित शिक्षक, अंशदायी व कंत्राटी शिक्षक, तसेच विभागातील विद्यार्थी व पीएच.डी. संशोधक यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहणे बंधनकारक केले. तशा सूचना विभागप्रमुखांना देण्यात आल्या. मात्र, सायन्स काँग्रेसच्या नोंदणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये भरावे लागणार असल्याने ते चिंतेत आहेत.
हेही वाचा >>> वर्धा: डॉक्टर तुम्हीसुद्धा! परिचारिकेस मिठी मारून…
हा कार्यक्रम भव्य करण्यासाठी विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरामध्ये १५ ते २० हजार व्यक्ती क्षमतेचे मंडप आणि इतर सुविधा तयार करण्यात येत आहेत. मात्र, दुसरीकडे कार्यक्रमातील उपस्थिती वाढवण्यासाठी नोंदणी सक्तीची अटही घालण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व संशोधकांमध्ये नाराजी आहे.
नोंदणी आवश्यक नाही
कार्यक्रमासाठी नोंदणी करणे अनिवार्य नाही. ते पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्याचबरोबर ३००० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याची चर्चाही चुकीची आहे. कोणतीही व्यक्ती विहित शुल्क भरून घरी बसून नोंदणी करू शकते. त्यासाठी कोणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. परंतु आमचा सल्ला आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा अनुभव घ्यावा. पण ज्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहायचे नाही त्यांच्यावर कोणतेही दडपण नाही.
– डॉ. गोवर्धन खडेकर, स्थानिक सचिव, इंडियन सायन्स काँग्रेस.