अमरावती : अमरावतीमधील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहायक व्यवस्थापक तथा स्थापत्य अभियंता पदावर कार्यरत महिला अधिकाऱ्याला कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीने मोबाईलवर आक्षेपार्ह सात ‘व्हॉइस मेसेज’ पाठवले. या प्रकारामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला असून, या प्रकरणाची महिला अधिकाऱ्याने शहरातील कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश मिश्रा (रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तक्रारदार महिला अधिकारी शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीवर आहे. या बँकेच्या नूतनीकरणाची जबाबदारी तक्रारदार महिला अधिकाऱ्याकडे आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील एका शाखेच्या इमारत नूतनीकरणाचा कंत्राट ठाणे येथील मनोरमा इंटरप्रायझेस या कंपनीला दिला आहे. या बँकेच्या नुतनीकरणाची जबाबदारीसुद्धा तक्रारदार महिला अधिकाऱ्याकडे आहे. राजेश शर्मा हा ठाण्याच्या याच कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो. दरम्यान, ७ एप्रिल २०२३ रोजी त्याने महिला अधिकाऱ्याला एक ‘व्हाइस मेसेज’ पाठवला, त्यामध्ये त्याने म्हटले की, ‘तेरा फोटो देखके मेरा दिल आया है, आय लव्ह यू, एक दिन मेरे साथ खाना खाने के लिए चल’ यासह अजूनही अनेक आक्षेपार्ह बाबी त्याने नमूद केल्या आहेत.
हा संदेश त्याने काही वेळानंतर डिलिट केला, मात्र महिला अधिकाऱ्याने तो संग्रहित करून ठेवला. तसेच त्याच दिवशी राजेश शर्माने महिला अधिकाऱ्याच्या एका परिचित आर्किटेक्टलासुद्धा महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत अत्यंत असभ्य भाषेत मोबाईलवर संदेश पाठवला. ‘माझी एकदा त्या महिला अधिकाऱ्यासोबत एकांतात मिटींग लावून द्या, पैसे नाही मिळाले तरीही चालेल.’ असा आक्षेपार्ह उल्लेख त्यामध्ये केला आहे. दरम्यान, त्याने असे एकूण सात संदेश पाठवले असून, त्यामधून त्याने संबंधित महिला अधिकाऱ्याचा छळ केला आहे. त्यामुळे महिला अधिकाऱ्याने ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगून पोलिसांत तक्रार दिली आहे.