नागपूर : नामिबियाहून भारतात आणलेल्या चित्त्याचा मृत्यूने हळहळलेल्या चित्ताप्रेमींसाठी आता आनंदाची बातमी आहे. मध्यप्रदेशातील ज्या कुनो राष्ट्रीय उद्यानात ‘साशा’ नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्यानातील दोन मादी चित्ता गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. नामिबियातून पहिल्या तुकडीत आठ चित्ता भारतात आणण्यात आले. त्या आठही चित्त्यांना नावे देण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ‘साशा’ चा मृत्यू झाला. ती साडेचार वर्षांची होती.
हेही वाचा >>> राम मंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या सागवानावरून श्रेयवाद; अलापल्ली येथे शोभायात्रा काढणाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार
आता ‘सियाया’ आणि ‘आशा’ या अनुक्रमे तीन आणि चार वर्षाच्या मादी चित्ता गर्भवती असल्याचे सांगण्यात येत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी त्या आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये नर चित्त्यांशी त्यांची जोडी जमली. चित्त्यांचा गर्भधारणेचा काळ साधारणपणे ९० दिवसांचा असतो. त्यामुळे ‘सियाया’ येत्या काही दिवसात बछड्यांना जन्म देईल, असा अंदाज आहे. तर ‘आशा’ देखील एप्रिलच्या उत्तरार्धात बछड्यांना जन्म देईल, असे सांगितले जात आहे. कोणत्याही अडथळ्याविना हे प्रक्रिया पार पडली तर तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांचा जन्म होईल.