कोरची तालुक्यातील भिमपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम करित असतांना सुनीता सुंदर पुडो या २४ वर्षीय तरूणीचा उष्माघातामुळे गुरूवार २ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मृत्यु झाला. कोरची या तालुक्याच्या ठिकाणाहून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगांव येथील रहिवासी असलेली सुनीता पुडो भिमपूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत नाला सरळीकरणाचे कामावर २७ मे पासून सुरू आहे. आज या कामाचा शेवटचा दिवस होता. या भागातील अनेक पुरूष आणि महिला मजूर सकाळी सात वाजतापासून कामावर होते. त्यात सुनीता हिचाही समावेश होता. काम करित असतांनाच सुनीताला अचानक भोवळ आली. लगेच तिला कोरची ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.खुणे यांनी तिला मृत घोषित केले. सुनीता हिचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ.खुणे यांनी माध्यमांना दिली. मृत सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. कुटूंब भूमिहीन असल्याने मजूरी करूनच घरचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे शासनाने सुनीताच्या कुटूंबियांन आर्थिक मदत करावी अशी मागणी समोर आली आहे. दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आज कडक उष्मा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा