भंडारा : शिक्षकाच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम एका शिक्षकाने केले आहे. शिकवणी वर्गातील एका विद्यार्थिनीला वारंवार कॉल आणि मॅसेज करून त्रास देणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात अखेर विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून संजय हिवराज बिसेन (३५) या शिक्षकाच्या विरुद्ध लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिक्षक हा गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा शिक्षक असून आर्यभट्ट करिअर ॲकॅडमी, लाखनी येथे शिकवतो. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी मागील अनेक दिवसांपासून तिला तिच्या मोबाईलवर दिवसरात्र फोन करून त्रास देत होता. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्याने पीडितेला फोन करून तिला प्रियकर आहे का? अशी विचारणा केली. पीडितेने त्याला खडसावून फोन आईला दिला असता आरोपीने मुलीच्या आईची माफी मागितली. यानंतर २० फेब्रुवारी रोजी त्यांनी अकादमीच्या कार्यालयात माफीही मागितली. असे असतानाही २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.४२ वाजता आरोपीने पुन्हा विद्यार्थिनीला ‘आय लव्ह यू’ असा संदेश व्हॉट्सॲपवर पाठवला.
पीडितेने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या मामा व काकांनी आरोपीला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आरोपीने पुन्हा पीडितेला ‘सॉरी’ लिहून मेसेज पाठवला. पीडितेने सांगितले की, आरोपींच्या या कृत्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, त्यामुळे तिने पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी आरोपी संजय बिसेन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुदाम कांबळे तपास करत आहेत.