तरुण तुर्कच अन् म्हातारे.. जरा जास्तच अर्क!
शिक्षणासाठी खेडय़ातून शहरात सार्वजनिक बसने ये-जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तरुणांपेक्षा आंबटशौकीन म्हाताऱ्यांकडूनच त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी स्वतंत्र बसची मागणी केल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
वरकरणी मजेशीर वाटणारा, पण प्रत्यक्षात वास्तवाच्या जवळ असलेले हे सर्वेक्षण मॉरिस महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्यावतीने करण्यात आले असून त्यात मुलींनी सांगितलेले एकेक चित्तथरारक अनुभव ध्वनिमुद्रित केले आहेत. शहरातील सीमा भागातून येणाऱ्या या मुली हुडकेश्वर रोड, काटोल मार्गे, पारडीमार्गे, वर्धा रोड, कोराडी, वाडीमार्गाने शहरात येतात. शहरातील बहुतेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेली महाविद्यालये सुरू होण्याची वेळ सकाळी ७ वाजताची आहे. त्यापूर्वीच मुली घरून निघतात. शिवाय, एक बस गेल्यावर दुसरी बस काही अंतराने असल्याने पहिली बस केवळ गर्दीमुळे त्या टाळू शकत नाहीत. काही पाच किलोमीटरवरून, काही १०, तर काही १५ किलोमीटरवरूनही प्रवास करून वेगवेगळ्या महाविद्यालयात जातात. त्यांना प्रवासादरम्यान काही त्रास होतो का, हे जाणून घेण्यासाठी गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘महाविद्यालयीन मुली आणि नागपूर शहर सार्वजनिक बससेवा’ या विषयावरील हे सर्वेक्षण शहरातील शासकीय विज्ञान संस्था, जी.एस. वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, धनवटे नॅशनल महाविद्यालय, आर.एस. मुंडले महाविद्यालय, एलएडी महाविद्यालय आणि मॉरिस कॉलेज, अशा सहा महाविद्यालयात करण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयातून ये-जा करणाऱ्या ५० मुली नमुना म्हणून घेण्यात आल्या. त्यात कला, विज्ञान, वाणिज्य, एम.ए आणि एम.कॉम.च्या एकूण ३०० विद्यार्थिनींकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात थक्क करणारी माहिती पुढे आली.
मुलींच्या मते, तरुण मुलांचा प्रवासात त्रास नसतो. उलटपक्षी कित्येकदा जागा करून देणे किंवा म्हाताऱ्यांच्या त्रासातून सोडवण्यासही ते मदत करतात, पण म्हातारे मुद्दाम धक्का देणे, अश्लिल वक्तव्य करणे, अश्लिल चाळे करणे आणि इतरही प्रकारचा त्रास देण्यास मागेपुढे पाहत नाही. शिवाय, गर्दी किंवा गाडी हलत असल्याने चुकून धक्का लागला असेल, असे इतर लोक समजावून सांगतात. शिवाय, वय झाल्याने म्हाताऱ्यांना सहानुभूतीही मिळते. सार्वजनिक बसमधून प्रवास करताना गर्दीत गैरसोय होत असल्याचे २४७ विद्यार्थिनींनी सांगितले. ती टाळण्यासाठी गर्दीच्या वेळेस स्वतंत्र महिला बस असावी, अशी मागणी ३०० पैकी निम्म्या मुलींनी केली आहे, तर २३ टक्के मुलींनी महिला वाहक असावी, ४५ टक्के मुलींनी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असावा, ३१ टक्के मुलींनी महिला हेल्पलाईन असावी, १२ टक्के मुलींनी बसमध्ये सुरक्षारक्षक असावा, तर ३९ टक्के मुलींनी महिलांसाठी जादा आरक्षित जागा असाव्या, अशी उघड मागणी केली आहे. शिवाय, स्वतंत्र महिला बसमध्ये महिला बसवाहक, सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार नोंदबूक, इतर बसपेक्षा वेगळा रंग, गर्दीच्या वेळी बसच्या जादा फेऱ्या असाव्यात, असेही विद्यार्थिनींनी सांगितले. स्वतंत्र महिला बसमुळे गर्दी दरम्यान होणारा त्रास निश्चितच कमी होईल, असे मत २६२ मुलींनी व्यक्त केले आहे, यावरूनच मुलींना ज्येष्ठ नागरिकांमधील आंबटशौकिनांचा होणारा त्रास कळतो.

सविस्तर मसुदा महापालिका आयुक्तांना देणार
यासंदर्भात मॉरिस महाविद्यालयातील भूगोलचे प्राध्यापक आणि प्रकल्प प्रमुख अविनाश तलमले म्हणाले, या सर्वेक्षणानंतर आम्हाला मुलींच्या समस्यांची तीव्रता समजली. ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना जास्त त्रास होतो. त्रास होणाऱ्या बहुतेक मुली १७ ते २१ वयोगटातील आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात एक स्वतंत्र महिला बस असायली हवी, यासाठी सविस्तर मसुदा आम्ही महापालिका आयुक्तांना सादर करणार आहोत.
ज्योती तिरपुडे