दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका ३० वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीने अंतिम वर्षाला नापास झाल्यामुळे अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा रामदास मुळे (नेरपिंगळाई, मार्शी, ता. अमरावती) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही नागपुरात हिंगण्यातील दंत महाविद्यालयात (बीडीएस) अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. तसेच ती एका डॉक्टरकडे सेवाही देत होती.
हेही वाचा : गडचिरोलीत पूरस्थिती; भामरागडचा संपर्क तुटला, ८ मार्ग बंद
गेल्या काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाचा निकाल लागला. पूजाच्या सर्वच वर्गमैत्रिणी उत्तीर्ण झाल्या. पूजा नापास झाल्यामुळे तणावात होती. तिच्या आईवडिलांनी तिची समजूत घातली. पूजा नैराश्यात गेल्यामुळे घरीसुद्धा गेली नव्हती. पूजाने ८ सप्टेंबरला सायंकाळी घर सोडले आणि थेट अंबाझरी तलाव गाठले. तिने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पूजा बेपत्ता झाल्यामुळे तिच्या घरमालकाने ‘एमआयडीसी’ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, शुक्रवारी सकाळी पूजाचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना दिसला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.