चंद्रपूर : सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावली नाही म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेने २३ विद्यार्थिनींना एक तास स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे दोन विद्यार्थिनी चक्कर येवून पडल्या तर काहींना उलटी, ओकाऱ्या झाल्या. या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील अष्टभूजा प्रभागात नटराज इंग्रजी स्कूल आहे. या शाळेत शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी वर्ग सात ते दहावीच्या २३ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी स्वच्छतागृहात एक तास बंद करून ठेवले. सलग एक तास स्वच्छतागृहात राहिल्याने जीव गुदमरला असता दोन विद्यार्थिनींना चक्कर आली तर इतर विद्यार्थिनींना उलट्या झाल्या. दरम्यान पीडित विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी कुटुंबियांना सांगितला. तसेच युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांना या घडल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. पालक व विद्यार्थिनींची तक्रार येताच युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सहारे व युवती सेना जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील यांनी थेट शाळेत धडक दिली. यावेळी पालक व युवा सेना कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापिका सरकार यांना धारेवर धरले. सुरुवातीला मुख्याध्यापिका सरकार यांनी असला कुठलाही प्रकार घडलाच नाही असे म्हणून टाळाटाळ केली. मात्र, विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला जाब विचारताच अखेर श्रीमती सरकर यांनी चूक मान्य केली.

हेही वाचा – “मी शुद्र असल्यामुळेच सुप्रिया सुळेंकडून लक्ष्य केले जाते”, सुनील तटकरे असे का म्हणाले….

हेही वाचा – उपराजधानी आता राजधानी वाटेवर, ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढले

या प्रकरणाची तक्रार आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनादेखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी केली जात आहे. तर मुलींना स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून अशा प्रकारची शिक्षा दिली, असे मुख्याध्यापिका सरकार सांगत आहेत. एकूणच हा प्रकार गंभीर आहे. तेव्हा कठोर शिक्षा करावी, अशी पालकांची मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female students were locked in the washroom by the headmistress of the school for not disposing of sanitary pads properly rsj 74 ssb
Show comments