कापड व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून व्यवसायाने शिक्षिका असलेल्या तरुणीवर कापड व्यापाऱ्याने बलात्कार केला. जेटानंद ऊर्फ जय सुरेशकुमार नारायणी (३२) रा. सिंधी कॉलनी, खामला असे आरोपीचे नाव असून त्याने या शिक्षिकेला युरोप व दुबई येथे फिरायला नेऊन तिथेही बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
पीडित २६ वर्षीय तरुणी दुबईत शिक्षिका आहे. आरोपीचे खामला परिसरात दुकान आहे. २०१४ मध्ये ती या दुकानात खरेदीसाठी गेली असता तिची आरोपीशी ओळख झाली. या दरम्यान आरोपीने तिचा मोबाईल क्रमांक घेतला व नंतर तिच्या मोबाईलवर विशेष ग्राहक म्हणून बक्षीस लागल्याचा संदेश पाठवला. आठ दिवसांनी तिला बक्षीस घेण्यासाठी दुकानात बोलावले. तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून महागडी घडय़ाळ भेट दिली. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री झाली. तो तिला रोज फोन आणि मॅसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. वाडी परिसरात त्याचे मोठे कापडाचे दुकान आहे. एक दिवस त्याने तिला या दुकानात नेले व मनसोक्त खरेदी केल्यावरही बिल घेतले नाही. यादरम्यान त्याने तिच्या संपत्तीची माहिती गोळा केली. ती लखपती असल्याचे समजताच त्याने तिला लग्नाची मागणी घातली. २०१७ मध्ये तिला दुबईत नोकरी लागली. तिने मुलाखतीला जात असताना त्याला सोबत नेले. दुबईत त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार केला. अश्लील छायाचित्रही काढले. त्यानंतर तो वेळोवेळी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करू लागला व एक दिवस तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.