नागपुरातील कामगार चळवळींनाही बळ दिले; जॉर्ज फर्नाडिस यांच्या आठवणींना उजाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन आणि तत्कालीन सरचिटणीस मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. संघ-अडवाणी विसंवाद दूर करण्यात ही चर्चा महत्त्वाची ठरली होती. एवढेच नव्हे तर कामगार चळवळीचे प्रणेते फर्नाडिस यांनी नागपुरातील कामगार चळवळींना बळ देण्यासाठी यशवंत स्टेडियम येथे जंगी जाहीर सभा घेतली होती. त्यांचा नागपूरच्या चळवळीशी असा घनिष्ट संबंध होता. आज त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पोहोचली आणि जॉर्ज फर्नाडिस यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
फर्नाडिस यांच्या हिंद मजदूर किसान पंचायतची धुरा नागपुरात दिवंगत उमेश चौबे सांभाळत होते. फर्नाडिस यांची १९७३ मध्ये यशवंत स्टेडियममध्ये मोठी जाहीर सभा झाली होती. ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते नागपुरात आले होते. त्यावेळी ही जाहीर सभा झाली होती. उमेश चौबे यांच्या जन्मदिनाचा समारंभ चिटणीस पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ते आर्वजून उपस्थित राहिले होते. नागपुरातील त्यांची ती शेवटची भेट असावी, असे लोहियावादी आणि फर्नाडिस यांचे निकटवर्ती हरीश अडय़ाळकर यांनी सांगितले.
तुटलेली चप्पल घेऊन चालत राहिले
नागपुरात १९९५ मध्ये हॉकर्सच्या आंदोलनादरम्यान आमच्यावर लाठीमार झाला होता. त्यावेळी जॉर्ज फर्नाडिस यांनी माहिती घेत मला दिल्लीला बोलावले. तेव्हापासून त्यांच्याशी संबंध होता. ९६-९७ मध्ये खासदार असताना ते नागपूरला आले होते. बालाघाटला एका कार्यर्त्यांच्या विवाहासाठी जाणार होते. विमानतळावरून रेल्वेस्थानकाकडे निघत असताना कॉटेन मार्केट चौकात गर्दी होती. अखेर ते पायी निघाले. पायी चालत असताना त्यांची चप्पल तुटली. तुटलेली चप्पल हातात घेऊन ते पुढे गेले.
– अनिल चव्हाण, कामगार नेते
जॉर्ज फर्नाडिस यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्यात एक साधुत्वाची, फकिरी वृत्ती दिसली. आपल्या मूल्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. आपल्यातील कार्यकर्तेपण त्यांनी नष्ट होऊ दिले नाही. म्हणून मी त्यांना माझा ‘आयकॉन’ मानत होतो. आपल्या राजकारणातून सामान्य माणसासाठीचा संघर्ष, कळकळ हळूहळू कमी होत असतानाच्या काळात जॉर्ज फर्नाडिससारख्या लढवय्या कार्यकर्त्यांचे, लोककल्याणकारी नेत्याचे निघून जाणे हे समाजाचे फार मोठे नुकसान आहे.
– नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
मुंबईमध्ये कामगारांचा संप होता आणि त्यानंतर कामगारांची बैठक होती. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातील हमालांचा माथाडी कामगारांमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी होती. त्यावेळी जॉर्ज फर्नाडिस यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नातून कायद्यात बदल करून हमालांचा कामगारांमध्ये समावेश करण्यात आला होता. कामगारांचे आंदोलन असले की त्यांच्या शब्दावर मुंबई-पुणे बंद होत असे. कामगारांसाठी त्यांच्या सारखा लढवय्या नेता पुन्हा होणे नाही.
– हरीश धुरट, कामगार नेते
मी घडलो ते जॉर्ज फर्नाडिसमुळेच. मुंबईला असताना रेल्वे मन फेडरेशनची बैठक आणि त्यानंतर रेल्वे कामगारांच्या संपात त्यांच्यासोबत सहभागी झालो होतो. मुंबई सोडून नागपूरला आपल्यावर त्यांनी रेल्वे कामगार संघटनेची जबाबदारी माझ्याकडे दिली. कामगारांना रेशनकार्ड मिळावे यासाठी नागपुरात आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्या आंदोलनाचे नेतृत्व मी केले. रेल्वे कामगारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले. नागपुरात हिंद मजदूर किसान पंचायत ही संस्था त्यांनी सुरू केली होती.
– हरीश अडय़ाळकर, कामगार चळवळीतील कार्यकर्ते
लोहियांच्या तत्त्वावर चालणारा आणि कामगारांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा नेता म्हणून जॉर्ज फर्नाडिसकडे बघितले जात होते. एका समाजवादी नेत्यांच्या मेळाव्यात त्यांची भेट झाली होती. आयुष्यभर कामगार, कष्टकरी, शोषित वंचित वर्गासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले.
– लीलाताई चितळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां.