केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हे कोळशापासून खतनिर्मिती कारखाना काढण्याची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्याच खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांना पटवून देण्यात यशस्वी झाले असेल तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील सादरीकरणावर या प्रकल्पाचे भवितव्य निश्चित होणार आहे.
विदर्भात बऱ्याच प्रमाणात कोळसा खाणी आहेत. कोळसापासून युरियानिर्मिती कारखाना काढण्याचे अहीर यांचे अनेक दिवसांपासून प्रयत्न आहेत. याबाबत ते अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोललेही आहेत. नितीन गडकरी यांना या प्रकल्पाविषयी राजी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील उमेरड तालुक्यात सोमवारी दोन कोळसा खाणींचे उद्घाटन झाले. यावेळी अहीर यांचा प्रस्ताव गडकरी यांनी उचलून धरला आणि केंद्रीय कोळसा व वीज राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी तो तत्त्वत मान्यही केला. त्यानंतर गोयल यांनी विदर्भात कोळशापासून खतनिर्मिती कारखाना सुरू करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. कोळसा आणि खते मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राहणार आहे. यासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल.
कोळशापासून युरियानिर्मितीचे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे भारतात पहिला युरियानिर्मिती कारखाना सुरू करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर यासंदर्भातील सादरीकरण नितीन गडकरी, हंसराज अहिर आणि मी स्वत सादर करणार असल्याचेही गोयल म्हणाले.