लोकसत्ता टीम
बुलढाणा: सहकार विद्या मंदिराचा हिरवाईने नटलेला परिसर, प्रशस्त सभागृह, राज्यभरातील दिग्गज व उदयोन्मुख खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात शुक्रवारी येथे फिडे नामांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला.
या स्पर्धेत राज्यातील १६० खेळाडू सहभागी झाले आहेत. बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक तथा उत्कृष्ट खेळाडू डॉ. सुकेश झंवर व आंतराष्ट्रीय महिला मास्टर्स तेजस्विनी सागर यांच्यातील प्रातिनिधिक लढतीने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे. बुलढाणा अर्बन, बुलढाणा जिल्हा चेस सर्कल, सहकार विद्या मंदिरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिरच्या प्रशस्त सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. झंवर, विख्यात खेळाडू तेजस्विनी सागर, तहसीलदार रूपेश खंडारे, अंकुश रक्ताडे, हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.त्यानंतर अत्याधुनिक सांस्कृतिक भवनात एकाच वेळी ८० टेबलवर ‘स्विस लीग’ पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली.
आणखी वाचा- “२०२४ पर्यंत विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं धोरण”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!
‘रेटिंग’ वाढवण्याची संधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही स्पर्धा १६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. स्पर्धा ही खुली व १७ वर्षांखालील गटासाठी ठेवण्यात आली आहे. डॉ. सुकेश झंवर व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताडे, हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली. स्पर्धा ८० फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतून खेळाडूंना आपले ‘रेटिंग’ वाढवण्याची व १ मे पासून पंजाबमध्ये आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली असल्याचे डॉ. झंवर यांनी सांगितले. यावेळी १९८८ रेटिंग प्राप्त आरुष चित्रे (नागपूर), १६६२ रेटिंग प्राप्त संस्कृती वानखडे (अकोला) यांच्यासह १६० खेळाडू, पालक उपस्थित होते.