उपराजधानीतील वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर बुधवारी शाळेचे विद्यार्थी नेणाऱ्या एका स्कूल व्हॅनचे चाक निखळले तर खसाळा-मसाळा परिसरात स्कूल व्हॅनने एका मुलाला चिरडले. या घटनेची दखल घेत नागपुरातील प्रादेशिक परिवहन विभागाने बुधवारी सकाळपासून तपासणी मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत १५ स्कूलब बस-स्कूल व्हॅन जप्त करण्यात आल्या.
हेही वाचा: विदर्भ ही मुख कर्करोगाची राजधानी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर शहर प्रादेशिक परिवहन विभागाने विविध पथके तयार करून बुधवारी सकाळपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्कूलबस, स्कूल व्हॅन तपासणीच्या कामी लावले. यामुळे स्कूल बसेस, व्हॅन बेपत्ता झाल्याचेही चित्र काही मार्गावर बघायला मिळाले. दरम्यान या पथकांनी दुपारपर्यंत ५० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनात वाहक नसणे, वाहनाची स्थिती योग्य नसणे, मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाची व्यवस्था नसणारी १५ वाहने जप्त करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नसल्याचेही भुयार यांनी स्पष्ट केले आहे.