नागपूर : लग्न सोहळा आटोपला आणि सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. ट्रॅक्टरवर निघालेल्या वऱ्हाड्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला. नागपूरजवळील कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या भीषण अपघातात तब्बल ५८ जणांचा मृत्यू झाला. २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपघातातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्हान-कांद्री येथील जयदुर्गा मंगल कार्यालयात ३ फेब्रुवारी २००५ रोजी लग्न समारंभ होता. या विवाह सोहळ्यासाठी काचुरवाहीचे गावकरी ट्रॅक्टरने आले होते. त्यांच्या गावातील बळीराम नाटकर यांचा मुलगा नरेशचा विवाह कांद्रीच्या गंगाधर सरोदे यांची कन्या शुभांगीशी होणार होता. काचुरवाहीचे गावकरी ७ ते ८ ट्रॅक्टरने वरात घेऊन आले होते. कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी ३ फेब्रुवारी रोजी कन्हानच्या त्या अपघातस्थळी मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेत असतात. यंदाही सत्यकार व दयाराम भोयर यांनी पुढाकार घेऊन त्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. गावकऱ्यांनी फुले वाहून तसेच मेणबत्त्या लावून आपल्या आप्तांचे स्मरण केले.

लग्न सोहळा आटोपला आणि सायंकाळी परतीचा प्रवास सुरू झाला. त्यावेळी कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर (नागपूर-हावडा मार्ग) फाटक नव्हते. ट्रॅक्टर या मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून वऱ्हाड्यांना घेऊन जात होते. त्याचवेळी रामटेकवरून नागपूरकडे जाणारी रेल्वेगाडी भरधाव येत होती. इंजिन काही सेकंदात ट्रॅक्टरला धडकले आणि ट्रॉलीत बसलेले हवेत फेकले गेले. एकच आकांत झाला. काय झाले कोणालाच काही कळत नव्हते. लग्न मंडपातील लोकांनीही तिकडे धाव घेतली. आजुबाजूच्या परिसरात माणसांचे मृतदेह, कुठे हात, कुठे पाय पडले होते. रक्ताचा आणि हाडामांसाचा सडा काय असतो ते तेथे दिसत होते. भरधाव इंजिनने तब्बल ५८ जणांचा बळी घेतला होता.

अपघाताचे वृत्त कळताच काचुरवाही शोकसागरात बुडाले. कोणाचे सांत्वन कुणी करायचे, अशी स्थिती होती. त्या सायंकाळी कुणाचीच चूल पेटली नाही. सर्व ५८ जणांचा तिसरा दिवस सामूहिक करण्यात आला होता. ३ फेब्रुवारी २०२५ पुन्हा गावकरी एकत्र आले आणि घटना स्थळी या २० वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण अपतातील नातेवाईकांना काचुरवाहीच्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. सत्यकार व दयाराम भोयर यांनी पुढाकार घेऊन त्या मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. गावकऱ्यांनी फुले वाहून तसेच मेणबत्त्या लावून आपल्या आप्तांचे स्मरण केले. आता येथे रेल्वे क्रॉसिंग नाही. त्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.