अकोला : शहरातील औद्योगिक वसाहतीतील कृषी उत्पादन गोदामांवर छापेमारी करून कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली. कृषी विभागाच्या पथकामध्ये खासगी व्यक्तींचा समावेश असून त्यांनी पाच लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप एमआयडीसी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पथकातील पाच खासगी व्यक्तींवर गुन्हे दाखल करा, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण करू, असा इशारा अकोला डेपो संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा >>> नागपूर: मध्य भारतातील पहिले मधुमेह तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे यांचे निधन
७ जूनपासून कृषी विभागाच्या पथकाकडून शहरातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामावर छापेमारी सुरू करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे, खते व कीटकनाशके कंपनीच्या पुरवठाधारकांच्या गोदामांची कृषी विभागाकडून दरवर्षीच तपासणी होत असते. दरम्यान, पुणे येथील कृषी उत्पादन गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत ७ जून रोजी छापा टाकण्यात आला. यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह हितेश भट्टड, दीपक गवळी, दीपक राजपूत, भीमराव कुळकर्णी व श्रीराम महाजन यांचा समावेश होता. या पथकातील खासगी व्यक्तींनी मालाची नासधूस केली. काही उत्पादकांना शिवीगाळ करून मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप कंपनीच्या व्यवस्थापकाने पोलीस तक्रारीत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यावर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. गोदाम सील करताना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. पथकाने नियमबाह्यरित्या गोदामांना सील लावण्यात आले आहे. पंचनाम्याची प्रत सुद्धा देण्यात आली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
या कारवाईमुळे सुमारे दोन हजार मजूर, वाहतूकदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांना गुन्हे दाखल करण्यास सांगितले. तरीही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी गुन्हे दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा अकोला डेपो संघटनेने दिला. पोलिसांनी काही जणांचा जबाब घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार राजेश शिंदे, प्रशांत भटकर, नितीन म्हैसने, माधुरी क्षीरसागर आदी उपस्थित होते. दरम्यान, पथकातील खासगी व्यक्ती कृषी विभागातील अधिकाऱ्यांना व्यावसायिकांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना व निर्देश देत होते. कृषी व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ते आमचे वरिष्ठ असल्याचे सांगितले, असे कृषी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.