नागपूर : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवसा पूर्वीच ब्राह्मण महासंघाने यातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलेला आहे. तसेच समता परिषदेनेही यातील एका दृश्यावर आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच्या चित्रपट वादात सापडलेला आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना थोर समाजसेवक म्हटले जाते. या चित्रपटातून त्यांचीच कहाणी समोर येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र असे कायमच म्हटले जाते. आता ‘फुले’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटातून महात्मा फुलेंचा जीवनपट उलगडला जाणार आहे.

नेमका वाद काय आहे ?

फुले चित्रपटांमध्ये काही दृश्य दाखवण्यात आलेली आहेत. महात्मा फुले एका लग्नात गेले असता त्यांना मारहाण करण्यात आल्याचे दाखवण्यात आलेले आहे. ब्राह्मण समुदायाने त्यांना मारहाण केली असे यात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने यावर आक्षेप घेतलेला आहे. असा कुठलाही प्रकार त्यावेळी लग्नात घडलेला नव्हता जर असा प्रकार घडला असता तर त्यांना लग्नात बोलावलेच नसते, अशा दृश्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते असा आक्षेप ब्राह्मण महासंघाने घेतला आहे. तर समता परिषदेनेही यावर आक्षेप घेत महात्मा फुलेंना मारहाण झाली नव्हती असं दाखला दिला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नवीन वाद समोर आलेला आहे.

प्रतीक गांधी साकारणार महात्मा फुले साकारणार

दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलेआहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film on mahatma jyotiba phule and savitribai phules social reform struggle releases on april 11 2025 dag 87 sud 02