लोकसत्ता टीम
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळाला ‘अ’ तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. तसेच, नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव देण्यासाठी विधिमंडळात आणि बाहेर यशस्वी लढा दिला. अलीकडेच त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली.
सांस्कृतिक कार्य मंत्री असताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी काढलेल्या राष्ट्रसंतांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या शासनादेशासंबंधी त्यांनी शेलार यांच्याशी चर्चा केली. तसेच, या चित्रपटाच्या कार्यारंभ आदेशासाठी पुढील पावले उचलण्यावर भर दिला. राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार आणि सेवेसाठी सदैव समर्पित राहण्याचा आपला संकल्प आ. मुनगंटीवार यांनी यावेळी पुन्हा अधोरेखित केला.
समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीची संकल्पना मांडण्यात आली. आता हा चित्रपट लवकरच साकारण्यात येणार असून याकरीता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा केली. शेलार यांनी या संदर्भात लवकरच कार्यारंभ आदेश काढण्यात येईल, असा शब्द आ. श्री. मुनगंटीवार यांना दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी कार्य केले आहे. अंधश्रद्धा, जातीभेद निर्मूलन, समाजजागृती आणि देशभक्तीचा संदेश देण्यासाठी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. विदर्भात त्यांचा विशेष प्रभाव असला तरी त्यांनी संपूर्ण देशभर समाजप्रबोधन केले. १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांना अटकही झाली होती. त्यातूनच त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर चित्रपट निर्मितीचे नियोजन सुरू आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री असताना आ. मुनगंटीवार यांनी या चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला होता.
या चित्रपट निर्मितीसाठी सहाय्यक अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरण आखले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीला सहाय्यक अनुदान देण्यास शासन निर्णयान्वये, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, हे विशेष.
अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा
या संदर्भात कलाकारांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. तसेच अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार यांनी अचूक माहिती व दर्जेदार कलाकृती म्हणून हा चित्रपट पूर्णत्वास यावा यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.