देवेश गोंडाणे
नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पेपरच्या दहा मिनिटांआधी समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित होण्याच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षीपासून तालुक्यातील ‘सुरक्षा खोली’पासून (कस्टडी रूम) ते परीक्षा केंद्रावर आणि विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका जाण्यापर्यंत संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या निरीक्षकांचा भ्रमणध्वनीही ‘ट्रॅक’ करण्यात येणार आहे.
करोनानंतर दोन वर्षांनी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होत आहे. ‘व्हॉट्सअॅप’ आणि इतर समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित होण्याच्या घटना वाढत आहेत. अनेकदा जुन्या प्रश्नपत्रिकाही प्रसारित करून संभ्रम निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व अनुभवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाची १० फेब्रुवारीला बैठक घेण्यात आली. राज्याचे प्रधान सचिव, शिक्षण विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव आणि सर्व विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत गोपनीयतेवर गंभीर चर्चा करण्यात आली. या वेळी परीक्षेच्या काही वेळेआधी प्रश्नपत्रिका प्रसारित होण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे आता प्रत्येक तालुका स्तरावरील सुरक्षा खोलीतून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका नेण्यापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. सोबतच ‘भ्रमणध्वनी ट्रॅकर’ लावणे बंधनकारक राहणार आहे. हे चित्रीकरण आणि ‘भ्रमणध्वनी ट्रॅकर’ची माहिती ही तालुका आणि जिल्हा स्तरावरील पथकांशी जोडली जाणार आहे. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला तरी तो तात्काळ समोर येणार आहे.
प्रश्नपत्रिकेचा असा असेल प्रवास..
प्रश्नपत्रिकांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरक्षा खोली (कस्टडी रूम) असते. येथून प्रश्नपत्रिका निरीक्षकामार्फत परीक्षा केंद्रांवर पोहोचवल्या जातात. हे करताना निरीक्षकांनी आपल्या भ्रमणध्वनीचा ‘जीपीएस’ सुरू ठेवणे आणि संपूर्ण कामाचे चित्रीकरण करणे बंधनकारक असेल. महिला निरीक्षकांनी गळय़ात भ्रमणध्वनी अडकवून ठेवावा अशा सूचना आहेत. यानंतर परीक्षा केंद्रात गेल्यावर तेथेही प्रश्नपत्रिका देतानाचे चित्रीकरण होणार आहे. यानंतर परीक्षकांकडेही प्रश्नपत्रिका देतानाचे चित्रीकरण करावे लागेल. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती ही जिल्हा आणि तालुका स्तरावर असणाऱ्या पथकांकडे राहणार आहे. त्यामुळे कुठेही गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका प्रसारित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गोपनीयता कशी राखता येईल यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या वेळी प्रश्नपत्रिका पाठवण्याचे पूर्ण चित्रीकरण आणि ‘ट्रॅकिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ, पुणे</p>