अमरावती : बेलोरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात असून प्रवासी विमानसेवा सुरू होण्यासाठी येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण करण्याचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा (एमएडीसी) प्रयत्‍न असला, तरी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या चमूच्या पाहणीनंतरच ‘अलायन्स एअर’ कंपनीच्या विमानांना उड्डाणाची परवानगी मिळू शकेल, असे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती विमानतळावरून ‘अलायन्स एअर’कडून विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडत गेले. बेलोरा येथील विमानतळावर १३०० मीटरची धावपट्टी होती. ‘एटीआर-७२’सारख्या विमानांना उतरणे सोयीचे व्हावे, यासाठी ही धावपट्टी १८५० मीटरपर्यंत वाढवण्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने केले. दुसरीकडे, ‘टर्मिनल बिल्डिंग’वर अखेरचा हात फिरवला जात आहे. ‘एटीसी टॉवर’ची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. सर्व तांत्रिक कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा ‘एमएडीसी’चा प्रयत्न आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा…तोंडावर ॲसिड फेकून तुझे आयुष्यच खराब करतो….बलात्कार पीडितेला रस्त्यात गाठून….

विमानतळाची पाहणी करण्यासाठी ‘डीजीसीए’चे पथक पुढील आठवड्यात येत आहे. त्यानंतर बेलोरा विमानतळावर उड्डाणे सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’ आणि ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’कडून परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमरावतीही देशाच्या हवाई नकाशावर येईल.

बेलोरा येथील विमानतळाची धावपट्टी ही १९९२ मध्ये उभारण्यात आली होती. सध्या या धावपट्टीचा वापर केवळ खासगी विमानांसाठी होतो. राज्य सरकारने २००९ मध्ये ‘एमएडीसी’ला बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्त केले होते आणि २८० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरीदेखील देण्यात आली होती. पण, हे काम रखडले. ‘एटीआर-७२’ प्रकारातील विमानाचे उड्डाण करण्यासाठी रात्रकालीन विमान उड्डाणाच्या सुविधेसह धावपट्टीची लांबी १३७२ मीटरवरून १८५० मीटपर्यंत वाढवणे व इतर कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. परंतु हे काम शेवटच्या टप्प्यात पुन्हा रखडले होते. ते आता पूर्णत्वास जात आहे.

हेही वाचा…अशी ही बनवाबनवी! विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक

वाहतूक सर्वेक्षण पूर्ण

अमरावतीहून ‘अलायन्स एअर’ची ‘एटीआर-७२’ ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी ‘अलायन्स एअर’कडून हवाई वाहतूक सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अमरावती विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विमानसेवेसाठी अलायन्स एअर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात डीजीसीएची चमू विमानतळाची पाहणी करणार आहे. – गौरव उपश्याम, विमानतळ व्यवस्थापक, अमरावती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final stage of belora airport expansion in amravati alliance air flights await dgca inspection mma 73 psg
Show comments