बुलढाणा : उमेदवारी भरण्याच्या शुभारंभाला का होईना, महायुतीतील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळाली आहे. येथून खासदार प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा निवडणूक लढविणार आहे.
महायुतीतर्फे प्रतापराव जाधव हे उमेदवार असून शिंदेगटाच्या पाहिल्याच यादीत त्यांचे नाव आहे. मागील ३ लढतीत सलग विजय मिळविणारे जाधव चौथ्यांदा मैदानात उतरणार आहे. २००९, २०१४, २०१९ च्या निवडणुकीत जाधव यांनी आघाडीला एकहाती धूळ चारली होती. यात दोनदा त्यांनी माजी मंत्री, सहकार नेते राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराला आस्मान दाखविले.
हेही वाचा – अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
हेही वाचा – वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
मागील २०१९ च्या लढतीत प्रतापराव जाधव यांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ केली होती. त्यांनी जळगाव-खान्देशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराम नागो राणे यांच्या सलग ३ विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. राणे यांनी १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये ही किमया केली होती. या दोघा नेत्यांनीच आजवरच्या काळात सलग तीनदा विजयी होण्याचा भीम पराक्रम केला आहे. आता चौथ्यांदा जाधव मैदानात उतरणार असून यंदा प्रथमच त्यांचा प्रतिस्पर्धी आघाडीऐवजी शिवसेना (उबाठा) राहणार आहे.
जाधव यांनी उमेदवारीबद्दल मुख्यमंत्री व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. मागील १५ वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय गायकवाड हे पक्षशिस्त पाळणारे नेते आहेत. ते निश्चितच माघार घेतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.