नागपूर : गेल्या १६ दिवसांत समाजमाध्यमांद्वारे विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगून सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडत आहे. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांची झोप उडाली आहे. अखेर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा जगदीश उईके (रा. गोंदिया) याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची सायबर पोलीस कसून चौकशी करीत असून पोलिसांनी मात्र या प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली आहे.

काही दिवसांत शेकडो विमाने, शाळा आणि मॉल्समध्ये जारी केलेल्या फसव्या बॉम्ब कॉलची चौकशी करत आहेत. या धोक्यांमुळे अनेक विमानांना आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे, विमानतळांवर आणीबाणी लागू करण्यात आली आहे आणि विमाने रद्दही करण्यात आली आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांची मोठे नुकसानही झाले आहे. नागपूर पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी जगदीश उईकेने बरेच ईमेल पंतप्रधान कार्यालय, रेल्वे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, विमानसेवा कार्यालये, पोलीस महासंचालक आणि रेल्वे सुरक्षा दलासह विविध सरकारी कार्यालयांना पाठवले होते. २१ ऑक्टोबर रोजी उईके यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या पद्धतीचे धमकी देणारे ईमेल पाठवले होते. त्यानंतर देशातील काही महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. गुरुवारी दुपारी विशेष शाखेतील पोलिसांनी जगदीश उईकेला ताब्यात घेतले. त्याला थेट सायबर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात जगदीश उईकेची कसून चौकशी करण्यात आली. त्याला बॉम्बस्फोटाच्या धमकी देण्यामागील उद्देशही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, जगदीश हा स्वतःला निर्दोष सांगून पोलीस यंत्रणा आणि शासनाला सतर्क करण्यासंदर्भात ई-मेल केल्याचा दावा करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या संदर्भात सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिसांच्या या गुप्ततेमुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा…स्वत: राज ठाकरेंनी गावात येऊन उमेदवारी दिली…पण, उमेदवाराने ऐनवेळी….

जगदीश स्वतःहून झाला हजर

गेल्या १६ दिवसांपासून पोलीस आणि अन्य तपास यंत्रणेची झोप उडविणारा जगदीश उईके दिल्लीवरुन थेट नागपुरात आला. तो थेट विशेष शाखेत हजर झाला. त्याला पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेते नेले. तेथे जगदीशची चौकशी केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली असून त्याच्या अटकेसंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या इ-मेलद्वारे धमक्या देणाऱ्या जगदीश उईकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. – डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त