यवतमाळ : भारत सरकारच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे प्रलोभन देऊन सहा जणांची तब्बल ४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवार, १० ऑगस्ट २०२३ ला गुन्हे नोंद करण्यात आले होते. यातील अनिरुद्ध आनंदकुमार होशींग (३०, रा. वाराणसी, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली होती. आज, मंगळवारी मीरा प्रकाश फडणीस (५५, रा. बालाजी सोसायटी, यवतमाळ) या महिलेला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सचिन अनील धकाते (रा. प्रजापती नगर, वडगाव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, धकाते यांचा मंगल कार्यालय व चित्रपट निर्मितीचा व्यवसाय असून, ते मीरा फडणीस या महिलेला पाच वर्षांपासून ओळखतात. त्यांचा मित्र चेतन भिसे हा देखील महिलेच्या संपर्कात होता. त्यांचे कधीकधी फोनवर बोलणे व्हायचे. दरम्यान, फडणीस हिने आपली पर्यटन मंत्रालयाच्या निर्देश सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याचे सांगितले. आपल्यासोबत पर्यटन विभागातील अधिकारी अनिरुद्ध होशिंग काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन मंत्रालयाच्या खूप योजना असून, त्यात गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होत असल्याचे वारंवार बिंबविले. होशींगसोबतची छायाचित्रे दाखवून फडणीस हिने विश्वास संपादन करीत सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक केली.
हेही वाचा – धक्कादायक! नागपुरात शंभरात सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन!
याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी अनिरुद्ध होशींग आणि मीरा फडणीस यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी होशींग याला अटक केली असून सध्या तो कारागृहात आहे, तर मंगळवारी पोलिसांनी मीरा फडणीस हिला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी करीत आहे.
हेही वाचा – वर्धा : डॉक्टरची पदवी देतो म्हणून टाकला फास, केले साडेतेरा लाख रुपये लंपास…
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांवर मोठे राजकीय दडपण असल्याची चर्चा होती. शिवाय आरोपी महिला महाराष्ट्रातील एका बड्या सत्ताधारी राजकीय व्यक्तीचा प्रभाव टाकून आपल्यावरील कारवाई टाळत होती, असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी फडणीस हिला अटक केल्याने फसवणूक झालेल्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.