बुलढाणा : एका फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या ‘बाउंसरनी’ कर्जदाराचे अपहरण करून त्याला तिनेक दिवस डांबून ठेवत मारहाण करतानाच त्याच्या अंगावर सिगारेटचे चटकेही दिले. नंतर त्याला बसस्थानकावर सोडून देण्यात आल्यावर भयभीत युवकाने नातेवाईकांच्या मदतीने शेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध अपहरणसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. फायनान्स कंपनीच्या या दादागिरी व अमानुष छळाच्या घटनाक्रमामुळे शेगाव खामगावसह जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : उपमुख्यमंत्री चक्क रांगेत, फडणवीस यांच्या साधेपणाचे नागरिकांद्वारे कौतुक

कॅपिटल नावाच्या कंपनीकडून शेगाव येथील अशपाक खान मेहता खान या ३२ वर्षीय युवकाने (एमएच २८ एबी ५७७ क्रमांकाच्या) बोलेरो वाहनावर कर्ज घेतले होते. मात्र, अपेक्षित कमाई होत नसल्याने अशपाकने वाहन अकोला येथील एकाला विकले. त्याच्याकडून कायदेशीररित्या नोटरी करून घेऊन कर्जाची रक्कम वाहन खरेदी करणारा फेडेल असा करार केला. मात्र, कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन अशपाक खान याला २३ ऑक्टोबरला रेल्वे स्थानकाजवळ थांबवले. त्याचे अपहरण करत शेगाव विश्रामभवनात नेत रात्री उशिरापर्यंत बेदमपणे मारहाण केली.

हेही वाचा >>> “एखाद्या लग्नात गेलं तरी खोकेवाला….”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत

यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून खामगाव शहरातील शंकर नगर भागातील एका घरात डांबून ठेवले. यानंतर चौघांनी अशपाकला बेदम मारहाण करत शरीरावर सिगारेटचे चटके दिले. तिनेक दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून पुन्हा अत्याचार करण्यात आले. यावरच न थांबता दोन धनादेशावर स्वतःच्या हस्ताक्षरात सात लाखांच्या रकमाही टाकून घेऊन व्हिडिओ बनवण्यात आल्याचे पीडितने सांगितले. यानंतर गाडी परत आणून देतो या आश्वासनानंतर गंभीर जखमी व भयभीत झालेल्या अशपाकला शंभर रुपये देत खामगावच्या बसस्थानकावर सोडून देण्यात आले.