राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांना लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप असणारे जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्या संदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. २०१८ ते २०२० या वर्षात डॉ. धवनकर यांच्या मार्गदर्शनात सहा संशोधकांनी पीएच.डी. घेतली. या सहा संशोधकांनी स्वत:चा पत्ता हा धवनकर यांच्या घरचा दिल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात असून पीएच.डी.साठी डॉ. धनवकर संशोधकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप होत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता अनेक खळबळजनक पुरावे समोर आले आहेत. २०१८ ते २०२० या कालावधीत डॉ. धवनकर यांच्या मार्गदर्शनात सहा उमेदवारांनी पीएच.डी. मिळवली. त्यांच्या कागदपत्रांवर बारकाईने नजर टाकली असता या पाच उमेदवारांचा पत्ता डॉ. धवनकर यांच्या घरचाच असल्याचे समोर आले. नागपुरात पीएच.डी. करताना हे संशोधक डॉ. धवनकर यांच्या घरी का थांबले होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व संशोधक उत्तर भारतातील आहेत. २०१८ ते २०२० या वर्षात नागपूर विद्यापीठात लागू असलेल्या पीएच.डी. नियमांनुसार त्यांना नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक होते.

हेही वाचा: नागपूर: धवनकरांच्या चौकशीनंतर आरोपपत्र!; कुलगुरूंनी खंडणी प्रकरणात मागितले स्पष्टीकरण

ज्या उमेदवाराने नागपूर विद्यापीठाव्यतिरिक्त अन्य विद्यापीठातून पीएच.डी. पात्रता पदवी प्राप्त केली असेल, त्या उमेदवारांना नोंदणीनंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राहावे लागेल, असे नियमात नमूद आहे. असे असतानाही उत्तर भारतातील या उमेदवारांनी डॉ. धवनकर यांच्या घराचा पत्ता कुठल्या आधारावर दिला असा प्रश्न समोर येत असून पीएच.डी. करून देण्यासाठी धवनकर हे विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला जात आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले नाही त्यांच्या पीएच.डी.मध्ये अनेक अडथळे निर्माण केले जात होते, अशीही माहिती आहे.

थेट ‘व्हायवा’ द्यायलाच नागपुरात आले
या प्रकरणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले, धवनकर यांची पूर्वीपासूनच वादग्रस्त प्रतिमा आहे. याआधीही अनेकवेळा आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ते अडकले आहेत. प्राध्यापकांची वसुली हे त्याचे ताजे उदाहरण आहे. पण पीएच.डी. प्रकरणात ते आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचे याआधीही समोर आले आहे. २०१८ ते २०२० यादरम्यान पीएच.डी. केलेले सहा विद्यार्थी हे सर्व राज्याबाहेरचे आहेत. त्यांनी नागपुरात अभ्यासक्रम पूर्ण केला नाही किंवा संशोधनही केले नाही. नियमानुसार त्यांना नागपुरात राहून पीएच.डी. अभ्यासक्रम, संशोधन व प्रबंध लेखन करणे अनिवार्य होते. मात्र हे उमेदवार नागपुरातही न आल्याने संपूर्ण प्रक्रिया डॉ.धवनकर यांनी पैसे घेऊन पूर्ण केल्याचे दिसून येते. हे उमेदवार थेट पीएच.डी. च्या ‘व्हायवा’ देण्यासाठी नागपुरात आले होते. डॉ. धवनकर यांच्या मदतीने सर्व गौडबंगाल करण्यात आला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करीत तिवारी यांनी शिष्टमंडळासह सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची भेट घेतली.

हेही वाचा: नागपूर: कुलगुरूंशी जवळीक असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक; डॉ. धर्मेश धवनकर प्रकरणात नवीन माहिती आली समोर

स्वाक्षरीपासून अर्जापर्यंत पैशांची मागणी
डॉ. धवनकर यांचे घर हाच संशोधकांचा पत्ता आहे. हे कोणत्याही नियमात बसत नाही. या प्रकरणाचीही चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर येईल. नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रक्रियेत अनेक प्रकारची अनियमितता आहे. स्वाक्षरीपासून अर्ज करण्यापर्यंत पैशासाठी उमेदवारांना त्रास दिला जातो. – अतुल खोब्रागडे, निमंत्रक यंग ग्रॅज्युएट फोरम.

धवनकरांकडून प्रतिसाद नाहीच
या प्रकरणात धवनकरांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनीला उत्तर दिले नाही.

हेही वाचा: लैंगिक शोषणाच्या तक्रारीची भीती दाखवत प्राध्यापकांची लूट!; नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

गंभीरतेने चौकशी व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे
लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या आधारावर नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून पैसे उकळण्याचे प्रकरण गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे येथे आल्या असता त्या बोलत होत्या. सातही विभाग प्रमुखांनी काही चूक केली नव्हती, तर त्यांनी असे भीतीपोटी लाखो रुपये का दिले, असाही प्रश्न उपस्थित होतो. ते खंडणी मागणाऱ्या प्राध्यापकाची त्याला न घाबरता पोलिसांकडे तक्रार करू शकत होते. मात्र त्यांनी तसे न करता घाबरून खंडणी का दिली, याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी याप्रकरणी सखोल तपास व्हावा, असे गोऱ्हे यांनी सांगितले. या पूर्वीही विद्यापीठामध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दाबले गेले का, याचाही तपास व्हावा, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader