अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अनेकांना व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुंदर फोटोला डीपी म्हणून ठेवण्याची सवय असते. मात्र, प्रोफाईल फोटोंचा गैरवापर करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मुलींचे प्रोफाईल फोटो कॉपी करून विवाह संकेतस्थळ किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर अपलोड करून अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या ५६ तक्रारी गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
सध्या व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जवळपास ८० टक्के तरुण-तरुणींचे अकाऊंट आहे. अनेक तरुण-तरुणी प्रोफाईल फोटो म्हणून सुंदर फोटोची निवड करतात. काही तरुणी वारंवार आपला प्रोफाईल फोटो बदलत राहतात. अनेक विवाहोच्छुक युवक-युवती योग्य जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रीमोनी साईट्सवर प्रोफाईल तयार करतात. राज्यात शेकडो बनावट विवाह नोंदणी संस्था कार्यरत असून याद्वारे अनेकांना लाखोंनी गंडा घालण्याचे काम सुरू आहे.

शहरात ठिकठिकाणी विवाह नोंदणी संस्था स्थापन करण्यात आल्या असून नोंदणी शुल्काच्या नावावर फसवणूक करतात. सायबर गुन्हेगारांकडून तरुणींच्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरून फोटो चोरण्याचे काम केले जाते. असे बनावट फोटो युवकांना पाठवले जातात. नोंदणी शुल्काच्या नावाखाली १५ ते २० हजार रुपये भरण्यास सांगितल्यानंतर तरुणींचा मोबाईल क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकावर बनावट मुली संवाद साधून लग्नाबाबत बोलणी करतात. शेवटी नापसंत करून त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला जातो. तसेच भलत्याच वेबसाईटवर मुलींचे फोटो अपलोड केल्याचेही उघडकीस आले आहे.

हेही वाचा: बुलढाणा: कार चालवत असतानाच हृदयघातरुपी ‘काळ’ आला; नातेवाईकांना फोन केला अन् …

प्रोफाईल फोटो ठेवा ‘लॉक’

तरुणींनी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर स्वतःचे प्रोफाईल फोटो लॉक करून ठेवावे. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. तसेच व्हॉट्सॲपवर प्रोफाईल फोटो (डीपी) ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. या सेटिंगमुळे आपला फोटो कॉपी करता येणार नाही तसेच गैरवापरही होणार नाही.

हेही वाचा: ‘लिस्ट लागणार आहे, जो पैसे देईल त्याचे नाव लिहा, न देणाऱ्यांचे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

फोटोंचा वापर बनावट वेबसाईटवर

सायबर गुन्हेगार प्रोफाईल फोटो चोरी केल्यानंतर थेट वेश्याव्यवसाय किंवा पॉर्न साईट्सवरही फोटो अपलोड करतात. सायबर गुन्हेगार तरुणांचे ध्यानाकर्षण करण्यासाठी तरुणींच्या फोटोचा गैरवापर करतात. काही वेबसाईटवरील तरुणींच्या फोटोवर क्लिक करताच नवीन लिंक उघडली जाते. तरुणीला भेटायचे असल्यास किंवा फोन नंबर हवा असल्यास वेगवेगळ्या किंमतीचे प्लॅन असतात. त्यावर क्लिककेल्यानंतर वेगवेगळी माहिती भरण्यास सांगून बँक खात्यात पैसे टाकून सभासद होण्यास सांगितले जाते.

गेल्या दोन वर्षांत प्रोफाईल फोटोंची चोरी करून गैरवापर करीत तरुणांची फसवणूक केल्याच्या ५६ तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तरुणींनी प्रोफाईल फोटो ठेवताना विशेष काळजी घ्यावी. प्रोफाईल लॉक करावा किंवा डीपीवर स्वतःचे फोटो ठेवू नये. – नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नागपूर