लोकसत्ता टीम
वर्धा: दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या या वर्षीच्या दीक्षांत सोहळ्यात डी. लिट.सन्मानासाठी सत्यनारायण नुवाल यांची निवड करण्यात आली आहे. हे नाव ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमके ते काय करतात व सन्मान का, असाही प्रश्न आला. त्यांच्याविषयी मग मिळालेली माहिती थक्क करणारी ठरावी.
दहावीपर्यंत शिक्षण व तेव्हाच शाई विकण्याचा व्यवसाय करणारा हा कर्तुत्व पुरुष आज पंधरा हजार कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक आहे. प्रामुख्याने स्फोटक संरक्षण सामुग्रीचा व्यवसाय आहे. जगातील चार खंडात त्याची निर्यात केली जाते. भारतात क्रमांक एकवर व जगात दहापैकी अव्वल असणारा हा उद्योग अवघ्या दहा वर्षात भरभराटीस आला. आकाश, अग्नी, ब्रम्होस, अशा नामवंत मिसाईलमध्ये सोलरचे प्रोपेलिन हे उत्पादन वापरल्या जाते. भिलवाडा येथून ते १९७७ ला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरला आले. येथे खाणी खोदकामात उपयुक्त स्फोटकांचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल सत्तारभाई यांच्याशी त्यांचा परिचय झाला. मग त्यांनी मागे वळून पाहलेच नाही. १९९६ ला त्यांनी नागपुरात स्फोटकांचा स्वतंत्र व्यवसाय छोट्या स्वरूपात सुरू केला. आज या उद्योगात ते शिखरावर आहेत.
हेही वाचा… तामिळनाडूतील थुतुकुडी जिल्ह्यात पालीची नवी प्रजाती
देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय ते ठेवतात. प्रसिध्दीपासून दूर राहण्यावर ते कटाक्ष ठेवतात. गायत्री परिवार, मारवाडी फाउंडेशनचे विश्वस्त असून रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत. संरक्षण सामुग्री व्यवसायात महिलांनी पुढे यावे म्हणून नुवाल प्रयत्नशील असून त्यांच्या उद्योगात पंचवीस टक्के महिला मनुष्यबळ आहे. वृक्षारोपण चळवळीस ते सातत्याने प्रोत्साहन देत आले असून वृद्धाश्रम संस्थेस त्यांनी सदैव मायेचा हात दिला. त्यांच्या सोलर कंपनीस आशियातील शंभर पैकी एक उत्कृष्ट कंपनी म्हणून पुरस्कार मिळाला असून फोर्ब्सच्या मुखपृष्ठावर झळकलेले नुवाल भारतात ९२ क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.