नागपूर: ‘ते’ लक्ष्मीचे वाहन.. उत्कृष्ट जैविक नियंत्रक म्हणून त्याची ख्याती.. तो शिकारी गटातील पक्षी.. तरीही घुबडाला इतर पक्षी विरोध करतात. आश्चर्य वाटले ना! पण एका शाळेच्या परिसरात बसलेल्या घुबडांना जेव्हा इतर पक्षी त्रास देताना दिसून आले, तेव्हा शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही अवाक् झाले.
घुबडांना इतर पक्षी त्रास देतात कारण अधिवासाच्या असुरक्षिततेतून हे घडून येते. फक्त घुबडालाच इतर पक्षी त्रास देत नाहीत, तर अनेक पक्षी अधिवासाच्या स्पर्धेतून एकमेकांना इजा पोहोचवण्याचा म्हणजेच त्या अधिवासातून एकमेकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. हा खरं तर एकटा राहणारा आणि निशाचर पक्षी.
हेही वाचा… टोमॅटो लागवड, दराविषयीचा अहवाल मागवला; वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार
दिवसभर तो एकाच ठिकाणी शांतपणे बसून असतो आणि रात्री मात्र त्याची भ्रमंती सुरु होते. ते लक्ष्मीचे वाहन असले तरीही त्याला अशुभ मानले जाते. तो उत्कृष्ट शिकारी आहे, पण घरटी मात्र चांगली बांधू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून घरटे बांधण्याऐवजी इतर पक्ष्यांनी घरट्यासाठी केलेल्या मेहनतीचा फायदा घेतात. यातूनही इतर पक्षी त्याला त्रास देतात. बहुतेकदा ते झाडांच्या पोकळीत आपला अधिवास शोधतात. ही पोकळी ‘वूडपिकर’ या पक्ष्याने तयार केलेली असते.