अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे. त्याचे रक्षण झालेच पाहिजे. परंतु यासोबतच व्यक्त न होण्याचेही स्वातंत्र्य असायला हवे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकानेच व्यक्त व्हायला हवे हा आग्रह चुकीचा आहे, असे स्पष्ट मत ख्यातनाम अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

प्रसिद्ध लेखक-नाटककार शेखर ढवळीकर यांनी त्यांची ही मुलाखत घेतली. या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर रोकठोक मते मांडताना प्रभावळकर म्हणाले, आज प्रत्येकालाच आपले म्हणणे जोरात मांडायचे असते. त्यामुळे मतमांडणीतही एक नकोसा कर्कशपणा जाणवायला लागला आहे. हे टाळता आले पाहिजे. आजकाल काहीही घडले की त्यावर प्रत्येकानेच व्यक्त व्हायला हवे, असा एक अदृश्य आग्रह असतो. पण, तो का असावा? त्याउलट एखाद्याला एखाद्या विषयावर व्यक्त व्हायचे नसेल तर त्याला ते स्वातंत्र्य मिळायला हवे. सर्वानीच मोठय़ा आवाजात बोलायची काहीच गरज नाही. शांत राहूनही समाजहिताची अनेक कामे करता येऊ शकतात. पण, आज याच्या अगदी उलट घडत आहे. ट्रोलिंग नावाचा नवीन प्रकार तर फारच तापदायक आहे. या ट्रोलिंगमुळे तुम्ही ज्या क्षेत्रात मोठे काम केले असेल ते काम आणि तुमची ओळख दोन्ही धोक्यात येत आहेत. हे थांबले पाहिजे, अशी भावनाही प्रभावळकरांनी अतिशय पोटतिडकीने व्यक्त केली.

अभिनय, लेखन या आपल्या कला-साहित्यातील मुशाफिरीबद्दल सांगताना प्रभावळकरांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलूंना स्पर्श केला. अभिनयाचा कुठलाही कौटुंबिक वारसा नसताना केवळ चकित करण्याच्या ऊर्मीतून नाटकांचा लळा लागला. कॉलनीतल्या मर्यादित परिसरातील ही आवड पुढे व्यावसायिक रंगमंचावर व त्यानंतर मालिका, चित्रपटापर्यंत घेऊन गेली. या प्रदीर्घ प्रवासात मला कुठल्याही विशिष्ट प्रतिमेत अडकायचे नव्हते. मी अगदी ठरवून हा नियम पाळला. ‘चौकट राजा’, ‘हसवा-फसवी’, ‘नातीगोती’, ‘अलबत्या-गलबत्या’, ‘एक डाव भुताचा’ ही नाटके, सिनेमा असेल किंवा चिमणराव, टिपरेंची भूमिका असेल, मी नेहमी पात्रांमधील वैविध्यता निवडली. केवळ माझी शरीरयष्टी पाहिली तर मी विनोदी भूमिका करीत असेल यावर विश्वास बसणे कठीण आहे. पण, माझ्यात विनोदबुद्धी उपजतच होती. तिला चिं. वि. जोशी, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी यांनी आणखी संस्कारित केले. व्यंग हेरण्याची एक नजर असायला हवी. ती माझ्यात होती. तिचा मी माझ्या लिखाणात व अभिनयातही खुबीने वापर केला, याकडेही प्रभावळकरांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.

वेबसिरीज करायला आवडेल

तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाची माध्यमेही वेगाने बदलत आहेत. वेबसिरीज हा त्यातूनच प्रसवलेला प्रकार आहे. या माध्यमावर अभिनयाचे दोन-तीन प्रस्ताव मलाही आले होते. परंतु हातात सध्या वेगवेगळी कामे असल्यामुळे पटकन त्याला होकार देता आला नाही. पण, पुढे तशी समर्थ संधी मिळाली तर वेबसिरीज करायला नक्कीच आवडेल. अशा नवनवीन प्रयोगांचे स्वागत व्हायलाच हवे.

करोनाचा कला क्षेत्रावर दूरगामी परिणाम होईल

करोनाच्या या काळात मीही चाचपडत आहे. या समस्येवर पटकन उपाय सापडेल असे दिसत नाही. हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली तरी लोक नाटकाला, सिनेमा बघायला घराबाहेर पडतील, असे वाटत नाही. करोनाचा कला क्षेत्रावर दूरगामी परिणाम होईल. अनेक गोष्टींचे स्वरूप बदललेले असेल. ऑनलाइन माध्यमांनाच प्रेक्षक प्राधान्य देतील, असे चित्र दिसतेय. कला क्षेत्रालाही या नवीन माध्यमांना स्वीकारावे लागेल, असेही प्रभावळकरांनी आवर्जून सांगितले.

कुठे थांबायचे हे कळायला हवे

‘हसवा-फसवी’चे साडेसातशे प्रयोग पूर्ण झाले होते. प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम नाटकाला लाभत होते. आणखी पाचशे प्रयोग सहज करता आले असते. परंतु नाटक ऐन भरात असताना मी त्याचे प्रयोग थांबवले. कारण, कुठे थांबायचे हे आपल्याला कळायला हवे. क्षेत्र कुठलेही असो त्यात साचलेपणा यायला लागला की त्यातले नावीन्य हरवून जाते. अशा वेळी कधी थांबणार हो.. असे कुणी विचारण्याआधी आपण स्वत:च थांबायला हवे.