गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असल्याचा फायदा घेत चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या दारुची तस्करी करणाऱ्या पाच जणांवर गडचिरोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात गडचिरोली येथील माजी पोलीस निरीक्षक तथा काँग्रेसचे स्वयं रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार यांच्या दोन मुलांचा समवेश आहे.  या कारवाईत टाटासुमोसह सव्वा आठ लाखांची दारू जप्त केली आहे. आकाश भरडकर, निखिल दामदेव मंडलवार, निरज दामदेव मंडलवार, अशी आरोपींची नावे असून, अन्य दोन अज्ञात युवकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांचा राजीनामा; नेमके कारण काय, जाणून घ्या…

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या येथे दारू पुरवठा केला जातो. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने आज, बुधवारी पहाटे आकाश भरडकर हा दामदेव मंडलवार व त्यांची मुले नीरज मंडलवार आणि निखिल मंडलवार हे चालवीत असलेल्या राज बारमधून टाटा सुमो वाहनाने गडचिरोलीच्या दिशेने दारु आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, अंमलदार प्रशांत गरफडे, श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोइना, हवालदार मनोहर तोगरवार हे मूल मार्गावर पाळत ठेवून होते. एवढ्यात एक वाहन येताना दिसले. पोलीस दिसताच सेमाना बायपासमार्गे पोटेगाव व चातगावकडे वाहन वेगाने पळून गेले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून बोदली गावाजवळ वाहन अडविले. अंधाराचा फायदा घेत वाहनातील दोन जण पळून गेले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख २४ हजार रुपयांची विदेशी दारु आणि बियर आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारू असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात आकाश भरडकर, निखिल मंडलवार, नीरज मंडलवार तसेच अन्य दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड प्रकरणाचा तपास करीत आहेत.