बुलढाणा : समृद्ध औद्योगिक वसाहतीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक नगरी ही खामगाव शहराची ओळख. तसेच चांदीच्या मोठ्या व्यापाऱ्यामुळे राष्ट्रीय स्तरावर रजत नगरी ही उपाधी देखील खामगावला प्राप्त झाली आहे.उद्योग आणि व्यवसायामुळे प्रसिध्द  नगरी  सोमवारी, १७ फेब्रुवारी रोजी  भीषण आगीमुळे हादरली!  या भीषण आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी साहित्य आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. तीन ठिकाणच्या अग्निशमन यंत्रणामुळे आज दुपारी ही आग जवळपास नियंत्रणात आली आहे.

खामगाव शहरातील लक्कडगंज भागात गोदामाला  सोमवारी अचानक आग लागली. पाहता पाहता ही आग चांगलीच भडकली. बारादान्याचे (पोत्यांचे ) गोदाम असल्याने  आगीने रौद्र स्वरूप धारण केले. लक्कडगंज भागात मुन्ना पाडिया यांचे अग्रसेन ट्रेडिंग कॉर्पोरेशन( सुतळीचे व्यापारी) या नावाने मोठे गोदाम (गोडाऊन) आहे. सदर गोडाऊन मध्ये मोठी भीषण आग लागली.या भीषण आगीची  माहिती परिसरातील जागृत नागरिकांनी गोदामचे मालक मुन्ना पाडिया तसेच खामगाव नगर परिषद च्या अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आगीचे रौद्र स्वरूप लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाना सुद्धा लक्कड गंज परिसरात पाचरण करण्यात आले. त्यानंतर तीन ठिकाणच्या अग्निशमन दलांनी पाण्याचा जोरदार मारा करुन आणि शर्थीचे प्रयत्न केल्याने ही भीषण आग आज सोमवारी दुपार पर्यंत कशीबशी नियंत्रणात आली.

दाट लोकसंख्येच्या वस्तीत गोदाम

खामगाव शहरातील लक्कड गंज परिसर हा दाट लोकसंख्येचा परिसर आहे.भर नागरी वस्तीमध्ये असलेल्या गोदामला लागलेल्या या आगीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये  दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.. लकडगंज भागात नागरि वस्ती असून सुद्धा मोठ्या संख्येने गोडाऊन आहेत .या अगोदर सुद्धा याच भागात मोठी आग लागली होती. सतत लागणाऱ्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक ठरले आहे. या आगीमध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस  लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.