वर्धा : तीन तासांपूर्वी लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून बुटीबोरी व अन्य ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहे. भंगार गोदामास लागलेल्या आगीने चांगलाच वणवा पेटला. लगतच्या एका उद्योगाने पेट घेतला. मात्र अन्य सहा उद्योगास सुरक्षित ठेवण्यास यश आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून दुचाकीवर बसत सर्वत्र आढावा घेणे सुरू केले. तर ‘लोकसत्ता ऑनलाईन’वर आगीबाबत सर्वप्रथम आलेल्या बातमीची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्वलनशील व अन्य स्वरुपाचे उत्पादन होत असूनही या ठिकाणी फायर स्टेशन नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एमआईडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी नऊ कोटी रुपये खर्चाची यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याचे निदर्शनास आणले. वर्धा व परिसरातील पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर बुटीबोरी व अन्य ठिकाणांहून गाड्या मागविण्यात आल्या. या सर्व यंत्रणांमार्फत आग विझविण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहे. पाऊण कोटी रुपयाच्या घरात हानी होण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होते.