संजय मोहिते
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील २५ निरपराध प्रवाशांचे बळी घेणाऱ्या अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यात आला आहे. मृत प्रवाशांचे ‘डीएनए’ अहवाल लवकरच प्राप्त होणार असून सर्वांची ओळख पटली आहे. तसेच चालकाचा अहवाल सुद्धा मिळाला आहे. ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीचे ‘फायर ऑडिट’ एका खाजगी संस्थेने केल्याची महत्त्वपूर्ण माहिती तपास अधिकारी मेहकर ‘एसडीपीओ’ प्रदीप पाटील यांनी दिली. या दुर्घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा नजीक झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ प्रवाशांचा जळून कोळसा झाला होता. यामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवणे अशक्य ठरले होते. यामुळे २४ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले तर एका मुस्लीम युवतीचे दफन करण्यात आले. या दुर्दैवी पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुनील कडासने विचारांती घटनेचा तपास अनुभवी व कुशल अधिकारी अशी ओळख असलेले मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे सोपवला.
हेही वाचा >>> सामूहिक अत्याचारप्रकरणी पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही! लेखी जवाब चक्रावून टाकणारा…
दैनंदिन कायदा-सुव्यवस्था तसेच देऊळगाव राजा उपविभागाचा प्रभार सांभाळणारे प्रदीप पाटील यांनी या आव्हानात्मक घटनेचा तपास केला. हा तपास निर्णायक व अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
मृतांच्या नातेवाईकांना क्लेम करता येईल
मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यासाठी त्यांच्या आईवडिलांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल येत्या काही दिवसात हा अहवाल प्राप्त होणार आहे. सर्व मृतांची ओळख पटली असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर मृतांच्या वारसांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यामुळे त्यांना अन्य काही ‘क्लेम’ करणे शक्य होईल. चालकाच्या रक्तात ‘अल्कोहल’चे अंश आढळून आले असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पाटील या चर्चेत म्हणाले. घटनास्थळी संकलित केलेल्या वस्तू, बसचे साहित्य, इंधन आदींची ‘फॉरेन्सिक’ चाचणी करण्यात येत असून याचा अहवाल लवकरच मिळेल. ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीचे ‘फायर ऑडिट’ एका खाजगी संस्थेने केले असल्याचे एसडीपीओ पाटील यांनी चर्चेअंती सांगितले.