लोकेसत्ता टीम
अमरावती : चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. या आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांच्या नोटा आणि फर्निचर भस्मसात झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.
सेंट्रल बँकेच्या चांदूर रेल्वे येथील शाखेत नियमित कामकाज सुरू असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ठिकाणाहून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच पळापळ झाली. ग्राहक आणि बँकेतील कर्मचारी लगेच बाहेर पडले. आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. आगीच्या घटनेची माहिती चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून तिवसा आणि धामणगाव रेल्वे येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
या आगीत जिवितहानी झालेली नसली, तरी बँकेतील कॅश काऊंटरमधील रोकड, महत्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी देखील तत्काळ पोहचून बंदोबस्त वाढवला.
बँकेतील एसी मध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि तेथून ही आग पसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत नेमके मालमत्तेचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या आगीच्या घटनेने चांदूर रेल्वे येथे पाच-सहा वर्षांपुर्वी लागलेल्या भीषण आगीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ३० एप्रिल २०१९ रोजी चांदुर रेल्वे-अमरावती मार्गावरील ढोले कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या अंबिका हॉटेलच्या किचन रूममधील गॅस सिलेंडरला आग लागली होती.
अमरावती मार्गावर रिकामी खोली अंबिका हॉटेलला खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येत होती. याठिकाणीच ही घटना घडली होती. या आगीत खाद्यपदार्थ तयार करण्याचे साहित्य जळून गेले होते. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती.
आगच्या ठिकाणी लागली त्या खोलील लागूनच हॉस्पिटल आहे आणि विद्युत मंडळाचे तालुका कार्यालय असल्याने कॉम्प्लेक्समधील दुकानाला आगीची झळ पोहचताच इतर दुकाने बंद करण्यात आली होती. आग लागल्याच्या अर्ध्या तासानंतर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येऊन संपूर्ण आग आटोक्यात आणली होती.