नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवेरा गावातील एसबीएल एनर्जी नावाच्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीतील गोदामाजवळ ठेवलेल्या खरड्यांंना सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग किरकोळ स्वरुपाची होती. ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच काटोलचे सहायक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले. व आगीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटोल तालुक्यातील येनवेरा गावात एसबीएल एनर्जी कंपनीला पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेने व्यावसायिक स्फोटके तयार करण्याचा परवाना दिला आहे. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कंपनी बंद असताना अचानक इमारत क्रमांक पाचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा आवाज काही सुरक्षारक्षकांना आला. त्यांनी लगेच इमारतीकडे धाव घेतली असता तेथे ठेवलेल्या खरड्यांना आग लागल्याचे दिसून आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने एसबीएल कंपनीत पोहचल्या. काटोल पोलीसही तेथे पोहचले. अग्निशमन दलाने तीन तासांपर्यंत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले.

“पहाटेच्या सुमारास खरड्यांच्या ढीगाला आग लागली होती. दोन तासांत त्यावर नियंत्रण मिळविण्यात आले. या प्रकरणी अद्याप कंपनीकडून तक्रार आली नसून तक्रार आल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आकडा कळेल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. – अनिल म्हस्के (सहायक पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)

आग किरकोळ स्वरुपाची – कंपनीचे प्रसिद्धी पत्रक

दरम्यान एसबीएल एनर्जी या कंपनीला लागलेली आग किरकोळ स्वरुपाची होती. त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले होते, असा दावा एसबीएल एनर्जी या कंपनीकडून प्रसिद्धी पत्रकाव्दारे करण्यात आला. याबाबत मंगळवारी कंपनीने माध्यमांसाठी एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.