गडचिरोली : भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. आज, शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगार भंगार बसेसमुळे कायम चर्चेत असतात. यापूर्वीही छप्पर उडालेल्या अवस्थेत धावणारी बस असो की पावसात छत्री घेऊन बसलेला चालक, अशा विविध कारणांनी गडचिरोलीतील प्रवासी वाहतूक राज्यभरात प्रसिध्दीझोतात आली होती. एकदा तर बसचे ‘वायपर’ खराब झाल्याने चालकाने चक्क हाताचा वापर करून बस चालविली होती. तशी चित्रफीत समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाली होती. विधिमंडळातही यावर चर्चा झाली. मात्र, त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुलचेऱ्याहून गडचिरोलीला जाण्यासाठी निघालेल्या बसने( एमएच- ०७ सी-९३१६) घोट मार्गावर जंगल परिसरात अचानक पेट घेतला. सदर बाब चालक व वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत.

हेही वाचा…भंडारा : घरचा की बाहेरचा? भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

दरम्यान, बसच्या समोरील भागाला आग लागली होती. यावेळी बसमध्ये ७-१० प्रवासी असल्याचे कळते. बसमधील ‘बॅटरी’मुळे ही आग लागल्याचे आगार व्यवस्थापकांनी माध्यमांना सांगितले. अवेळी धावणाऱ्या भंगार बसेसमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना आता जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ येत असल्याने तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire breaks out in state transport bus in gadchiroli driver and conductor s prompt action prevents disaster ssp 89 psg