लोकसत्ता टीम
अकोला : शहरातील गंगाधर प्लॉट येथील आरती अपार्टमेंटच्या तळ मजल्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर या अपार्टमेंटमध्ये १५ जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात यश आले असून आग आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले.
गंगाधर प्लॉट येथे आसरा आणि आरती हे दोन आजूबाजूला अपार्टमेंट आहेत. त्यातील आरती अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर फ्रेमिंगचा उद्योग करणाऱ्या दिलीप धनी यांचे गोदाम आहे. या अपार्टमेंटच्या तळमजल्याला आज सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीच्या घटनेमध्ये गोदामातील लाकूड आणि फ्रेमिंगचे साहित्य जळून खाक झाले. अपार्टमेंटमधील ११ दुचाकी व तीन सायकल आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत. या अपार्टमेंटमध्ये १२ कुटुंबांचे वास्तव्य आहे. आग लागली त्यावेळी सुमारे १५ जण इमारतीमध्ये उपस्थित होते. जीव वाचवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. ग्रिल तोडून स्थानिकांनी रहिवाशांचा बचाव केला. १५ जणांना इमारतीतून बाहेर काढले.
आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळावर धाव घेतली व आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. दोन जण किरकोळ जखमी झाले . घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आग लागल्यानंतर या ठिकाणी वीज पुरवठ्याची केबल जळून तुटली. त्यातून स्फोट होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलीस अधीकारी सतीश कुळकर्णी आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात नागरिकांनी मोठे गर्दी केली होती. गंगाधर प्लॉटमधील अरुंद बोळींमुळे बचाव कार्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. या आगीच्या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला.