लोकसत्ता टीम

भंडारा : घरगुती गॅस सिलेंडर वापरताना घ्यावयाची दक्षता, प्रतिबंधक उपाय आणि या संबंधी जनजागृती करण्यासाठी एका गॅस वितरक कंपनीकडून प्रात्यक्षिक दाखविले जात होते. मात्र हे प्रात्यक्षिक शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्या कक्षासमोर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कक्षात बंदिस्त जागेत दाखविण्याचा गंभीर प्रकार काल १२.३० वाजता दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात घडला. मुळात मोकळ्या जागेऐवजी शासकीय कार्यालयाच्या आत असे अघोरी प्रात्यक्षिक करण्याची परवानगी दिली कोणी ? वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली होती का? या प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला असता तर कोण जबाबदार असते? हा प्रकार नियमबाह्य असल्याचा आक्षेप नोंदवित अशा प्रात्यक्षिकामुळे जीवितहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद भंडाराचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांच्या कक्षासमोर त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे कक्ष आहेत. ही जागा अरुंद असून बंदिस्त आहे. काल दुपारी चक्क कार्यालयीन वेळेत या बंदिस्त कक्षात एका गॅस वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून गॅस सिलेंडर वापरासंबंधी याचे धडे दिले जात होते. कक्षातील एका टेबलवर गॅस सिलेंडर ठेवून सिलेंडरचा भडका उडवून दाखविला जात होता. यात आगीच्या ज्वाळा थेट सीलिंग पर्यंत जात होत्या.या विभागातील जवळपास १० महिला आणि ५ ते ७ पुरुष कर्मचारी जीव मुठीत घेऊन हे थरारक प्रात्यक्षिक पाहत होते. या वेळी शिक्षणाधिकारी त्यांच्या कक्षात उपस्थित नव्हते. सिलेंडरमधील गॅस बंदिस्त कक्षात जमा होऊन त्याचा भडका उडल्यास शासकीय दस्तएवजासहित कर्मचाऱ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकला असता. या अघोरी प्रात्यक्षिकामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता आली नसती. मात्र हा सर्व प्रकार नियमांची पायमल्ली करणारा असून याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विजय क्षीरसागर यांनी केली आहे. क्षीरसागर हे या संपूर्ण घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असून त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला आहे.

आणखी वाचा-राज्यात नऊ नव्या RTO कार्यालयांचा मार्ग मोकळा; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची शासनाकडून दखल

या बाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) रवींद्र सोनटक्के यांना विचारणा केली असता, याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत मीटिंग मध्ये असल्यामुळे कार्यालयाच्या कक्षात अशाप्रकारे प्रात्यक्षिक दाखविले गेले का याबद्दल माहिती काढून सांगतो असे सोनटक्के यांनी सांगितले.