दिवाळीचा सण साजरा होत असताना काही युवकांनी परतवाडा शहरातील धार्मिक स्थळासमोर फटाके फोडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन समुदायांकडून किरकोळ दगडफेकही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून परिचित असणाऱ्या अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरात दिवाळीचा आंनदोत्सव सुरु असताना दोन युवकांनी दुचाकीवर बसून जयस्तंभ चौक व केजीएन चौकात फटाक्यांची आतषबाजी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. या परिसरात २ ते ३ वेळा चकरा मारुन त्यांनी फटाके फोडले. काही फटाके धार्मिक स्थळाच्या आत फुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले. किरकोळ दगडफेक करण्यात आली, पण काही नागरिकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.गस्तीवरील पोलिसांना धार्मिक स्थळाबाहेर दोन्ही समुदायातील युवकांचा जमाव आढळून आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी गोंधळ घालणा-या युवकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सध्या शहरात शांतता आहे.