नागपूर : नागपूर वनखात्याच्या अखत्यारितील अंबाझरी जैवविविधता उद्यान गेल्या दोन दिवसांपासून आगीत धूमसत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास या उद्यानाला आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने ती विझवली, पण पुन्हा बुधवारी त्याचठिकाणी आगीचा भडका उडाल्याने या उद्यानाविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अंबाझरी जैवविविधता उद्यानात मंगळवारी दुपारच्या सुमारास वणवा लागला. यात मोठ्या प्रमाणावर जंगलाची हानी झाली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे सुमारे सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हवेमुळे तुकड्यातुकड्यांमध्ये आग दिसून येत होती. सायंकाळी उशिरा आग पूर्णपणे आटोक्यात आली. या वणव्यात सुमारे १५ हेक्टर जंगल जळाल्याचा अंदाज वनखात्याने व्यक्त केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यापेक्षा अधिक म्हणजे ६० ते ७० हेक्टर जंगल जळाले. अंबाझरी जैवविविधता उद्यानात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्यात जंगल जळते. कधी शॉर्टसर्किटचे कारण दिले जाते, तर कधी लगतच्या परिसरातून आग उद्यानात आल्याचे सांंगितले जाते. २०२१ साली लागलेल्या वणव्यात सर्वाधिक २५० हेक्टर जंगल जळाले होते.
हेही वाचा >>>अकोला लोकसभा मतदारसंघात गठ्ठा मतपेढीवर लक्ष, कुणबी समाज केंद्रस्थानी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी
दरवर्षी लागणाऱ्या आगीमुळे उद्यानातील गवताळ प्रदेश आणि जैवविविधतेचे नुकसान होत आहे. मंगळवारी वाडी-एमआयडीसी मार्गावरील जैवविविधता उद्यानात वणवा लागला. वासुदेव नगर परिसरातील लिटील हूड आणि अंबाझरी परिसरातील जंगलात आग लागली. घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर आणि सिव्हिल लाईन्स अग्निशमन केंद्रातील पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जैवविविधता उद्यानातील आगीची माहिती एमआयडीसी अग्निशमन विभागाला मिळताच विभागाची पाच वाहने घटनास्थळी पोहोचली. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटाेक्यात आली. मात्र, तुकड्यातुकड्यांमध्ये आग धुमसतच होती. सायंकाळी उशिरा आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. वनखात्याने यात दहा ते १५ हेक्टर जंगल जळाल्याचे सांगितले असले तरीही प्रत्यक्षदर्शींच्या मते ६० ते ७० हेक्टर जंगल वणव्यात राख झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक त्रुटी
नैसर्गिक जैवविविधता नष्ट करून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी पक्षीप्रेमींनी या उद्यानाला विरोध केला होता. नैसर्गिक जैवविविधता नष्ट करू नका असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, उद्यानाच्या रूपाने या जंगलाचे व्यावसायिकीकरण करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी फ्लायकॅचर, इंडियन पिट्टा यासारख्या पक्ष्यांचे अस्तित्व संपले आहे. मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या मोरांची संख्या कमी झाली आहे. जैवविविधता उद्यान झाले असले तरी सुरक्षिततेच्या नावाखाली अनेक त्रुटी आहेत.