लोकसत्ता टीम
बुलढाणा : चिखली ‘एमआयडीसी’ मधील जय गुरू गणेश जिनिंगमधील अग्नितांडवात कापूस गाठी राख झाल्या असून यंत्रसामुग्रीचे देखील नुकसान झाले आहे.
आज, शुक्रवारी दुपारी दोनच्या आसपास लागलेली ही भीषण आग अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. आगीत १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चिखली एमआयडीसी मधील प्लॉट क्रमांक बी – ३ मध्ये अभय जैन यांच्या मालकीचे जय गुरू गणेश जिनिंग आहे. तेथील प्रेस हाऊस मध्ये कापसाच्या गाठी बनविण्याचे कार्य सुरू होते. या ठिकाणी असलेल्या ‘ऑनलाइन बेल्ट’ वर अचानक ‘शॉर्ट-सर्किट’ झाल्याने प्रेस हाऊस मधील जय गुरू गणेश जिनिंग व रोकडोबा जिनिंग मधील कापूस व सरकीला आग लागली. पाहतापाहता आग पसरून जवळपास पाच लाखांचे कापूस, सरकी आगीत भस्म झाले.
आणखी वाचा-अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात उसळी, ‘हे’ आहे आजचे दर…
यंत्रसामुग्रीचे देखील अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. चिखली येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. चिखली पोलीस ठाण्याच्या स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सविता मोरे पाटील व सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद हुसे यांनी भेट देऊन पंचनामा केला.