नागपूर : मतमोजणीच्या पूर्वसंध्येला शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच गोळीबाराची घटना घडली. जीमच्या खरेदी विक्रीवरून झालेल्या वादातून अपहरण करून गोळीबार करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास विहीरगावच्या नर्सरीजवळ घडली. महेश माथने (३२) रा. अवधूतनगर याचे ‘फ्युचर पॉईंट’ या नावाने जीम आहे. दोन आठवड्यांपूर्वी जीमच्या विक्रीसंदर्भात अतुल ढोके (३२) रा. गीतानगर (मानेवाडा) यांच्यासोबत करार झाला होता. या व्यवहारावरून महेश नाराज होता. त्याने अतुलला तिरंगा चौक येथे बोलावले. ठरल्याप्रमाणे अतुल पोहोचला. महेशने त्याला स्वत:च्या कारमध्ये बसवले आणि भूखंड दाखवण्याच्या उद्देशाने नरसाळा आऊटर रिंग रोडवर घेऊन गेला. यावेळी त्याच्यासोबत संकेत घुगेवार हासुद्धा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> संतापजनक! नराधम बापाचा स्वत:च्याच दोन मुलींवर शारीरिक अत्याचार

काही वेळातच तिघेही विहीरगावजवळ पोहोचले. महेशने अचानक पिस्तूल काढले आणि एक गोळी हवेत झाडली. या प्रकारामुळे घाबरलेला अतुल जीव मुठीत घेऊन पळायला लागला. महेश पिस्तूल घेऊन त्याच्या मागे धावला. अचानक घडलेला प्रकार पाहून कारमध्ये बसलेला संकेतही घाबरला आणि त्यानेही पळ काढला. यावेळी आरोपीने गोळीबार केला. पळताना अतुल खाली पडला. महेशने त्याला पुन्हा कारमध्ये कोंबले. संकेतने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> ‘एक्झिट पोल’ झाले, उद्या ‘एक्झाट पोल’, प्रतापराव जाधवांचा विक्रमी विजय, की खेडेकर ‘जायंट किलर’ ठरणार?

पिस्तूल जप्त, बुलेटचा शोध

माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी पथकासह धाव घेतली आणि दोघांनाही ताब्यात घेतले. अंगझडतीत महेशजवळ एक पिस्तूल मिळाले. तसेच कारमध्ये दारूच्या बाटल्याही मिळाल्या. तत्पूर्वी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी घटनेसंबंधी संपूर्ण माहिती घेतली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत बुलेट शोधत होते.

पोलिसांसमोर आव्हान लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा म्हणजे मतमोजणी असल्यामुळे नागपुरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्तांनी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. अतिरिक्त पोलिसांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण व्हायला हवी होती. मात्र, उलट गुन्हेगार थेट अंधाधुंद गोळीबार करून नागपूर पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing incident during tight police security on eve of vote counting in nagpur adk 83 zws
Show comments