हिंगोली – भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर मंगळवारी दुपारी तीन गोळ्या झाडल्या. हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली. त्यांना तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले आहे. पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञातांकडून तीन गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील एक गोळी पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
पप्पू चव्हाण काही कामानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने कार्यालयातील सर्व कर्मचारी अचानक कशाचा आवाज आला म्हणून बाहेर पडले. पप्पू चव्हाण यांचे ओळखीचे दीपक हिरास यांनी तात्काळ चव्हाण यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,पोलीस उपाधीक्षक प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक विकास पाटील आपल्या संपूर्ण ताफ्यासह जिल्हा परिषद येथील घटनास्थळी पोहोचले. दोन काडतूस सापडले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा – “नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच…”, अजित पवारांकडून स्तुतीसुमनं
चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडणारा व्यक्ती पायी जिल्हा परिषदेच्या मैदानात आला होता. दरम्यान पप्पू आपल्या वाहनासमोर असताना या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि तो तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला.