यवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यातील तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर प्रकल्प कळंब तालुक्यातील सावरगाव (परसोडी) येथे आज शुक्रवारी कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे परिसरातील एक हजार ४६ शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. सावरगाव (परसोडी) येथील हा अमरावती परिमंडळात सुरू करण्यात आलेला पहिला सौर प्रकल्प आहे. सावरगाव सौर प्रकल्प महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या १५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. अवादा या विकासकामार्फत पूर्ण करण्यात आलेला हा प्रकल्प महावितरणच्या ३३ केव्ही सावरगाव (परसोडी) उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे ३३ केव्ही सावरगाव (परसोडी) उपकेंद्रातून निघणाऱ्या ०३ कृषी वीज वाहिनीवरील २५ गावातील एक हजार ४६ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते हा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात आला.

प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंता प्रविण दरोळी,कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम चव्हाण, शशांक पोंक्षे, उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड, सागर डेकाटे, सुहास मेश्राम तसेच सावरगाव येथील सरपंच शशीकांत देशमुख यांनी जमीन हस्तांतर ते प्रकल्पपूर्तीकरिता महत्वाची भूमिका पार पाडली.सौर ऊर्जेचा वापर करून स्थानिक पातळीवर वीज निर्माण करायची व त्याच्या आधारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करायचा अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौरऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. अवादा एनर्जी या विकासकामार्फत जिल्ह्यात २२५ मेगावॅट वीज निर्मितीसाठी ३९ उपकेंद्राकरीता ५७ ठिकाणी क्लस्टर पध्दतीन सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातील सावरगाव (परसोडी) हा पहिला प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे.

अमरावती परिमंडळात कार्यान्वित झालेला हा पहिलाच प्रकल्प असल्याने, शेतकऱ्यांमध्येही या वीज पुरवठ्याबाबत उत्सुकता आहे. या प्रकल्पामुळे दिवसा सिंचनासाठी अखंडित वीज मिळाल्यास शेतकऱ्यांवरील अनेक संकट दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सौर प्रकल्पाची उपयुक्तता लवकरच सिद्ध होणार आहे.

Story img Loader