नागपूर : अ‍ॅड. सतीश उके यांच्या विरोधात एका जमिनीच्या प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या तक्रारीच्या आधारे ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र या प्रकरणाची मूळ तक्रार आणि त्यावरील मूळ कारवाई  महाराष्ट्र आणि नागपूर पोलिसांचीच आहे.  ईडीनंतर आली, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 फडणवीस शुक्रवारी नागपुरात आले असता प्रसार माध्यमाशी बोलत होते.  फडणवीस यांच्या इशारावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप उके यांच्या वडिलांनी केला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची मला माहिती नव्हती. उकेंविरोधात २००५ पासून वेगवेगळे गुन्हे आहेत. न्यायाधीशांची  तक्रार केल्याबद्दल त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने  शिक्षा केली.  या प्रकरणात जे  कायदेशीर आहे तेच होईल, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस-पटोलेंचा एकत्र प्रवास

देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज एकाच विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. विमानतळावर  प्रथम फडणवीस आणि नंतर पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमचे पक्ष वेगळे असले तरी आम्ही मित्र आहोत, असे दोघांनीही सांगितले.   

मुंबई मेट्रोबाबत श्रेयवादाची लढाई नाही

मुंबई मेट्रोच्या टप्पा ३ चे काम ८० टक्के झाले आहे. मात्र, कारशेड न मिळाल्यामुळे चार वर्षे ही मार्गिका सुरू होणार नाही. आरे कारशेड मिळाले तर आठ महिन्यात  सुरू होईल. त्यामुळे मुंबई मेट्रोचे श्रेय जसे ते घेतात तसे अपश्रेय सुद्धा त्यांना घ्यावे लागेल. मुंबई मेट्रोबाबत श्रेयवादाची लढाई नाही, असेही फडणवीस म्हणाले.

उके माझे वकील, हा अपप्रचार- पटोले  नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील निवडणूक याचिका, रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील याचिकेत अ‍ॅड. सतीश उके आपले वकील आहेत. परंतु ते वकील म्हणून इतरांचीही प्रकरणे हाताळतात. पण उकेंचे निमित्त करून भाजपकडून काँग्रेस आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केला. अ‍ॅड. सतीश उके यांना ईडीने काल अटक केली. त्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी थेट विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्याचे टाळले. पण, केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत ईडीच्या माध्यमातून दहशत निर्माण  करीत असल्याचा आरोप केला. मुंबईतील ईडीचे अधिकारी नागपुरात येतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना त्याची माहिती नसते. स्थानिक सुरक्षा यंत्रणांनाही कल्पना दिली जात नाही. याचा अर्थ हे षडयंत्र आहे, असेही पटोले म्हणाले.

उके बंधूंना ईडी कोठडी 

मुंबई : जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या वकील सतीश उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना विशेष पीएमएल न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने शनिवारी सतीश उके आणि प्रदीप उके यांना नागपूर येथून ताब्यात घेतले होते.

 ईडीने गुरुवारी वकील सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या नागपुरातील घरी पाच तास शोध मोहीम राबवली. ईडीने नागपूरच्या कार्यालयात उके बंधूंची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. उके बंधूंना मुंबईत आणल्यानंतर शुक्रवारी दुपारी  १२ च्या सुमारास न्यायालयासमोर हजर केले. उके यांच्याकडे तपास करण्यासाठी ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. सतीश उके आणि प्रदीप उके यांची विविध प्रकरणांत कोठडीमध्ये तपासाची गरज असल्याचा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. उके यांनी ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेत न्यायालयात स्वत:च युक्तिवाद करत आपली बाजू मांडली. ईडीने त्यांच्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने खटला केल्याचा दावा त्यांनी केला. सतीश उके याच्या वतीने त्यांचे वकील रवी जाधव याऩीही ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. उके हे व्यवसायाने वकील आहेत. अटकेनंतर उकेंना २४ तासांत न्यायालयात हजर करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. ईडीचे अधिकारी कायदेशीर प्रक्रिया पाळत नाहीत, असा युक्तिवाद जाधव यांनी केला.