वर्धा: मध्यभारतातील पहिलीच अशी शवविच्छेदन प्रयोगशाळा येथील मेघे अभिमत विद्यापिठात सुरू करण्यात आली आहे. विद्यापिठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात ही शवविच्छेदन कौशल्य प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तसेच अत्याधुनिक नवतंत्र प्रणालीवर शस्त्रक्रिया व वैद्यकीय चिकित्सेच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव देणारी ही मध्यभारतातील पहिली व एकमेव प्रयोगशाळा असल्याचे कुलगुरू डॉ. ललित वाघमारे यांनी उद्घाटन प्रसंगी नमूद केले.
हेही वाचा… चोवीस तासांत दोन हत्याकांडाने उपराजधानी हादरली
विद्यापिठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रधान सल्लागार सागर मेघे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रयोगशाळेत सुसज्ज शल्यचिकित्सा टेबल, सी आर्म यंत्र, ग्रील उपकरण संच, आंतररचना तपासणीची दुर्बीण व अन्य सुविधा आहे. कौशल्य प्रशिक्षणावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळांच्या आगामी आयोजनात या प्रयोगशाळेचा उपयोग करण्यात येणार आहे.
हेही वाचा… गडचिरोली: भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या गटविकास अधिकाऱ्याकडे भामरागड नगरपंचायतीचा प्रभार!
प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, कुलसचिव डॉ. श्वेता काळे, मुख्य समन्वयक डॉ.एस.एस.पटेल, अधिष्ठाता डॉ.अभय गायधने, वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.उदय मेघे, विभागप्रमुख डॉ. चिमुरकर तसेच तज्ञ मार्गदर्शकांची यावेळी उपस्थिती होती.