चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस समितीचा अध्यक्ष असल्याने मी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही सोबत घेवून चालणार आहे. दिवं. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघावर काँग्रेस पक्षाकडून पहिला हक्क आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आहे. काँग्रेस नेत्यालाच या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह संयुक्त पत्रपरिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. धोटे म्हणाले, शहर तथा ग्रामीण भागात काँग्रेसची ध्येयधोरणे तथा पक्षाचे काम प्रामाणिकपणे पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षवाढीसाठी लवकरच चंद्रपुरात काँग्रेसचा मेळावा घेणार आहे. या मेळाव्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेते मंडळी तथा प्रदेश स्तरावरील नेत्यांना पाचारण करणार आहे.
हेही वाचा >>> अमरावतीत १ हजार एकरमध्ये विकसित होणार ‘पीएम मित्र-मेगा टेक्सटाईल पार्क’!
पहिल्या डावात चार धावा काढून बाद झालो होतो, मात्र दुसऱ्या डावात आता शतक झळकावणार आहे. वडेट्टीवार पालकमंत्री असताना जिल्हा विकास व नियोजनच्या बैठकीत काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना सावत्र वागणूक देत होते. राजुरा व भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारा संघासाठी निधीच देत नव्हते. वडेट्टीवार धोटे-धानोरकर यांच्यामुळेच मंत्री झाल्याचे आपण त्यांना सांगितले. आता विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील निधी देत नाही, अशी तक्रार धोटे यांनी केली. मुनगंटीवार संकुचित भावना ठेवून काम करीत आहेत. हा प्रकार योग्य नाही, असे धोटे म्हणाले.
देवतळेंकडून नियुक्ती पत्र थांबविण्यासाठी प्रयत्न
आपल्याला जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र मिळू नये, यासाठी पदमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले. २९ मे रोजीच अखिल भारतीय काँग्रेस समिती कार्यालयातून जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा दूरध्वनी आला होता. मात्र, धानोरकर यांच्या निधनामुळे दहा दिवस उशिराने पत्र काढा, अशी विनंती आपण स्वत: वरिष्ठांना केली होती, असेही धोटे यांनी सांगितले.